पुणे : पुढारी वृत्तसेवा : जागा खरेदी करताना नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये (डीपी) प्रस्तावित असलेल्या रस्त्यांची यादी महापालिका क्षेत्रीय कार्यालयनिहाय संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. महापालिकेच्या जुन्या हद्दीचा तसेच 1997 मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 37 गावांचा विकास आराखडा मंजूर झालेला आहे. या आराखड्यांमध्ये अस्तित्वातील रस्त्यांसोबतच नव्याने अनेक रस्त्यांची आखणी करण्यात आलेली आहे. बहुतांश जुन्या रस्त्यांच्या दुतर्फा पूर्वीपासूनच बांधकामे अस्तित्वात आहेत.
परंतु विकास आराखड्यातील त्याठिकाणची संभाव्य रस्ता रुंदी नवीन व्यक्तींना लक्षात येत नाही. काही वेळा गैरसमजातून रस्ता रुंदीत असलेल्या जागेंचे व्यवहार देखिल होतात. प्रामुख्याने सर्वसामान्य नागरिक छोट्या जागा खरेदी करतात, व त्याठिकाणी बांधकाम व अन्य वापर सुरू करतात. भविष्यात रस्ता रुंदी करताना ही बांधकामे पाडावी लागत असल्याने संबंधितांचे नुकसान होते.
आराखड्यातील नव्याने आखलेल्या रस्त्यांच्या जागा मोकळ्या असल्याने अनेकदा त्यांचेही व्यवहार होत असल्याचे निदर्शनास येते. ज्यावेळी महापालिकेच्यावतीने तो रस्ता विकसित करण्याचे काम हाती घेतले जाते, त्याचा फटका जागा खरेदी करणार्याला होतो. तसेच महापालिकेलाही भूसंपादनामध्ये अडचणी येऊन कामाला बराच विलंब होतो. त्यामुळे नागरिकांची फसगत व रस्त्यांच्या कामातील विलंब टाळण्यासाठी विकास आराखड्यातील नव्याने आखलेल्या रस्त्यांची क्षेत्रीय कार्यालय निहाय यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. जेणेकरून नागरिकांना काम करताना माहिती मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.
हेही वाचा