लंडन : कोस्टारिकाजवळ खोल समुद्रात संशोधकांनी आतापर्यंत कधीही न पाहिलेली ऑक्टोपस प्रजाती शोधली आहे. एकूण चार प्रजातींचे हे ऑक्टोपस असून या प्रजातींना अद्याप नाव देण्यात आलेले नाही. त्यापैकी सर्वात खोलवर असलेल्या प्रजातीला 'डोरॅडो ऑक्टोपस' असे म्हटले जात आहे. अन्य तीन प्रजाती त्यांच्या अधिवासापेक्षा वरील स्तरात आढळून आले.
मोंटेरे बे अक्वॅरियम रिसर्च इन्स्टिट्यूटमधील जिम बॅरी यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की केवळ दोनच मोहिमांमध्ये ऑक्टोपसच्या चार अज्ञात प्रजाती सापडणे ही उत्साहवर्धक बाब आहे. खोल समुद्रातील जैवविविधतेची माहिती यामधून मिळते. त्यामुळे भविष्य काळात अशा अनेक नव्या प्रजातींचा शोध लागू शकतो.
श्मिड ओशन इन्स्टिट्यूटकडून याबाबतच्या दोन शोधमोहिमा आखण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका मोहिमेत 'डोरॅडो आऊटक्रॉप' नावाच्या जलीय दगडी रचनेत ऑक्टोपसची काही अंडी आढळली व त्यामधून पिल्ली बाहेर येत असतानाही पाहण्यात आले. त्यामुळे या प्रजातीला 'डोरॅडो ऑक्टोपस' असे टोपण नाव देण्यात आले आहे. त्यांचा तसेच अन्य ऑक्टोपसच्या नमुन्यांचा अभ्यास केल्यावर या वेगळ्याच प्रजाती असल्याचे निष्पन्न झाले.