‘सामान्य’ बरणी होती चक्क तीनशे वर्षांपूर्वीची! | पुढारी

‘सामान्य’ बरणी होती चक्क तीनशे वर्षांपूर्वीची!

न्यूयॉर्क : काही सामान्य वाटणार्‍या वस्तूही ‘अँटिक पीस’ असू शकतात. तशी अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत. विशेषतः चीनमधील जुन्या राजवंशाच्या काळातील काही सिरॅमिकची भांडी, कटोरे अशी दुर्मीळ आणि मौल्यवान असल्याचे अभ्यासाअंती निष्पन्न झाले होते. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. एक सामान्य वाटणारी बरणी चक्क तीनशे वर्षांपूर्वीची होती व अर्थातच आता तिला मोठी किंमत आली आहे.

एका कुटुंबाकडे हा जुना सिरॅमिक पॉट होता. त्याचे झाकणही कुठे तरी हरवले होते. बॅनबरीच्या हॅन्सन हॉलोवेज ऑक्शनीर्सच्या पॉल फॉक्स यांनी सांगितले की या बरणीवरील निळा रंग पाहिल्यावरच ही वस्तू मौल्यवान आहे हे लक्षात आले होते. तिचा अभ्यास केल्यावर ही बरणी चीनच्या कांगशी राजाच्या काळातील असल्याचे निष्पन्न झाले. ती सन 1661 ते 1722 या काळातील आहे.

सतराव्या शतकातील या बरणीचा लिलाव करण्यात आला आणि तिला 1 लाख 57 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची बोली लावण्यात आली. पॉल फॉक्स यांनी सांगितले की चिनी संस्कृतीमध्ये अशा निळ्या रंगात कलाकुसर केलेल्या भांड्यांचे अतिशय महत्त्व आहे. तिथे निळा रंग हा प्रगतीचे प्रतीक मानला जातो.

Back to top button