काँग्रेसची सांगलीसाठी प्रसंगी टोकाची भूमिका : आ. विश्वजित कदम | पुढारी

काँग्रेसची सांगलीसाठी प्रसंगी टोकाची भूमिका : आ. विश्वजित कदम

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्हा हा काँग्रेसच्या विचारधारेचा पक्ष आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळायला हवी. महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी दावा करू नये. या जागेसाठी प्रसंगी टोकाची भूमिका घेऊ, अशी रोखठोक भूमिका आमदार विश्वजित कदम यांनी घेतली आहे. काँग्रेसच्या राज्यातील तसेच केंद्रातील वरिष्ठ नेत्यांकडे ही भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे सांगलीची जागा ठाकरे शिवसेनेला की काँग्रेसला, याबाबत आठवड्यानंतरही संभ्रम कायम आहे.

आमदार कदम यांच्यासह ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस उपाध्यक्ष विशाल पाटील,
जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा असल्याचे सांगितले. त्यानंतर कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सांगली लोकसभेचा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नाही. अशा स्थितीतही शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सांगलीच्या जागेवर हक्क सांगितला आहे. डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांना उमेदवारीचा शब्द दिला आहे. ही भूमिका ते वारंवार मांडत आहेत. उद्धव ठाकरे यांची मिरज येथे सभा होणार आहे, उमेदवारीचा विषय आमच्यासाठी संपला आहे, असा दावा ते करत आहेत. या स्थितीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. नेत्यांच्या मुंबईत हालचाली वाढल्या आहेत. सकाळी या सर्वांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. त्यानंतर बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांची एकत्रित बैठक झाली. सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली. तीन महिने काँग्रेसचे कार्यकर्ते निवडणूक लढविण्याच्यादृष्टीने प्रयत्नशील आहेत. अखेरच्याक्षणी महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये सांगलीची जागा जर ठाकरे शिवसेनेला दिली गेलीच, तर मैत्रीपूर्ण लढतीशिवाय पर्याय उरणार नसल्याची भूमिका काँग्रेस घेईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

आ. कदम यांनी सांगितले की, सांगली हा कित्येक वर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने सांगलीसाठी हट्ट करू नये. त्यांनी ज्यांना उमेदवारी दिली आहे, ते चंद्रहार पाटील शिवसेनेत 6-7 दिवसांपूर्वी गेले आहेत. जिल्ह्यात 600 गावे आहेत. त्यातल्या 10 टक्के गावांत तरी ठाकरेंच्या शिवसेनेचे सरपंच आहेत का? जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमची चांगली ताकद आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीत आमचे वर्चस्व आहे. आमच्याकडे कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांची मोठी फळी आहे. त्यामुळे सांगलीची जागा निवडून येण्यात कोणतीही अडचण नाही. त्यामुळे आम्ही प्रसंगी टोकाची भूमिका घेऊ, पण सांगलीत काँग्रेस लढणारच.

नेतृत्वाकडून रोखठोक भूमिका

स्वातंत्र्यानंतर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील आदींनी सांगली जिल्ह्याला काँग्रेसचा बालेकिल्ला बनवले. नंतरच्या पिढीत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्यासारख्या नेत्यांनीही काँग्रेस वाढवली. पतंगराव यांच्याप्रमाणेच आमदार विश्वजितही काँग्रेस बळकट करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या दूरद़ृष्टीच्या भूमिकेमुळे जिल्ह्याचे काँग्रेसचे नेतृत्व आपसुकच त्यांच्याकडे आले. या नेतृत्वाला साजेशी त्यांची वाटचाल असल्याचे त्यांनी घेतलेल्या रोखठोक भूमिकेवरून दिसते.

Back to top button