कोणता झेंडा घेऊ हाती? ; महायुती आणि महाआघाडीमुळे इच्छुक उमेदवारांपुढे पेच | पुढारी

कोणता झेंडा घेऊ हाती? ; महायुती आणि महाआघाडीमुळे इच्छुक उमेदवारांपुढे पेच

सुषमा नेहरकर-शिंदे

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि आमदारकीच्या इच्छुक उमेदवारांसाठी नक्की कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरू असा मोठा पेच निर्माण झाला आहे. सध्या खासदारकीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर देखील ही मोठी समस्या आहे. यात महायुतीमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर लोकसभेवर दावा केल्याने हा पेच अधिकच वाढला आहे.
दरम्यान हीच स्थिती जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्यातील आमदारकीसाठी इच्छुक ’भावी आमदार’ यांच्यासोबत देखील झाली आहे.

महायुती-महाआघाडीत मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळणार यावर अनेक गणिते अवलंबून राहणार असून, सध्या बहुतेक सर्व उमेदवार संभ्रमावस्थेत आहेत, हे नक्की. सध्या राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा शिंदे गट यांचा हा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. यामुळेच अजित पवार आणि शिंदे गटाचा शिरूर लोकसभा मतदारसंघावरील दावा रास्त असला तरी उमेदवारांसमोर कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घ्यावा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

या लोकसभेत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर महायुती-महाआघाडीतील कोणत्याही एकाच पक्षाला मतदारसंघ मिळणार आहे. परंतु इतकी वर्षे प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करून उमेदवारीच मिळणार नसेल तर पक्षात राहिलो तरी कशासाठी असा प्रश्न पडला आहे. यामुळेच जुन्नर विधानसभेत इच्छुक उमेदवार भाजपच्या आशा बुचके, शिंदे गटाचे शरद सोनवणे आणि काँग्रेसचे सत्यशील शेरकर यांची निवडणुकीसाठी नक्की कोणत्या पक्षाची उमेदवारी घ्यावी असा पेच निर्माण झाला आहे.

हीच परिस्थिती खेड विधानसभेतदेखील निर्माण झाली असून, हा मतदारसंघ महायुतीमध्ये विद्यमान आमदार असलेल्या अजित पवार गटाला जाणार हे निश्चित मानले जाते. यामुळेच खेड विधानसभेचे भाजपचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली असून पक्षाला मतदारसंघ न मिळाल्यास कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घ्यायचा याची चाचपणी सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण निवडणूक लढविणार नसल्याचे सांगत भाजपच्या बहुतेक सर्व कार्यक्रम, बैठकांपासून तसेच सामाजिक कार्यक्रमातून अलिप्त असलेल्या देशमुख यांनी वाढदिवसानिमित्तनिमित्त जोरदार शक्तिप्रदर्शन करत भावी आमदार म्हणून फ्लेक्स, बॅनरबाजी केली आहे. परंतु देशमुख यांच्यासमोर देखील निवडणुकीत कोणता पक्ष असा प्रश्न निर्माण झाला आहे. हीच परिस्थितीत आंबेगाव, शिरूर विधानसभा मतदारसंघातील महायुती-महाआघाडीतील इच्छुक उमेदवारांसमोर निर्माण झाली आहे.

हेही वाचा

 

Back to top button