Pune : भीमा नदीपट्ट्यातील वनक्षेत्रात बेकायदा वृक्षतोड

Pune : भीमा नदीपट्ट्यातील वनक्षेत्रात बेकायदा वृक्षतोड
रावणगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील पूर्व भागातील मलठण, राजेगाव, वाटलूज, नायगाव या भीमा नदीकाठालगत असलेल्या वन विभागाच्या हद्दीतील कुरण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वन विभागाचे काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने तब्बल पाच एकर क्षेत्रातील वृक्षांची बेकायदा वृक्षतोड झालेली आहे. काही ठिकाणी कोळसाभट्ट्याही असल्याचा ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला आहे.
संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार मलठण ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी सहायक वनसंरक्षक पुणे कार्यालयाकडे केली आहे.
याबाबत माहिती अशी की, दौंड तालुक्यातील मलठण, राजेगाव, वाटलूज, नायगाव येथील वन विभागाच्या हद्दीत भीमा नदीपात्रालगत व इतर भागांत वन विभागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे नदीलगतच्या भागात काटेरी झुडपांचे कुरण आहे, तसेच यामध्ये कडुनिंब व इतर वृक्षही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून या क्षेत्रातील वृक्षांची 100 ते 150 लोकांकडून बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे. मलठण येथील अंदाजे 5 एकर क्षेत्रातील वृक्ष या लोकांनी मोठ्या संख्येने तोडले आहेत. एवढेच नव्हे तर सुरू असलेल्या चर्चेनुसार त्या क्षेत्रातील वन्यप्राण्यांचीही त्यांनी कत्तल केली आहे, असा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे.
याबाबतची माहिती वन अधिकार्‍यांना दिली. मात्र, त्यांच्याकडून ते आमच्या हद्दीत येत नाही तसेच कारवाई करण्यासाठी आमच्याकडे कर्मचारी नाहीत, गाडी नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, ग्रामस्थांनी सखोल चौकशी केली असता असे निदर्शनास आले की, वन खात्याच्या कर्मचार्‍यांनीच संगनमताने वृक्षतोड सुरू केली आहे. त्यांच्या या ठिकाणी कोळसाभट्ट्या आहेत. कोळसा तयार करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून झाडांची कत्तल केली जात आहे. याबाबत दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडेही तक्रार केली .
या वृक्षतोडीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक भष्टाचार सुरू आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर वन विभागाच्या अधिकार्‍यांनी या ठिकाणी सुरू असलेली वृक्षतोड त्वरित थांबवावी, वृक्षतोडीचा पंचनामा करून संबंधित वृक्षतोड करणारे मजूर, वन विभागाचे वनपाल, वनरक्षक व तालुका वन अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करावी, अशी लेखी मागणी मलठण ग्रामपंचायतीने वन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे. संबंधित वनपाल रवी मगर यांच्याशी संपर्क साधला असता सरसकट कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news