कालठण ते चिखलठाणदरम्यान पूल उभारावा : खासदार सुप्रिया सुळेंना निवेदन  | पुढारी

कालठण ते चिखलठाणदरम्यान पूल उभारावा : खासदार सुप्रिया सुळेंना निवेदन 

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर शहरातील बाजारपेठ वाढावी यासाठी भीमा नदीवरील कालठण नंबर 2 ते चिखलठाण (ता. करमाळा, जि. सोलापूर) या ठिकाणी पूल उभारण्यात यावा, यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी इंदापूर शहर व्यापारी संघाकडून करण्यात आली.  इंदापूर शहरातील व्यापार्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार सुळे यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये मंगळवारी (दि. 16) बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये व्यापार्‍यांकडून निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली.
यावेळी इंदापूर शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत शहा, उपाध्यक्ष संदीप  वाशिंबेकर, कार्याध्यक्ष नंदकुमार गुजर, सचिव मेघशाम पाटील, सहसचिव दिलीप  कासार आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  इंदापूर शहरामध्ये हॉकर्स झोन मार्केटची उभारणी करावी, शहरातील मुख्य बाजारपेठ अरुंद असल्याने या ठिकाणी असणारे होमगार्ड कार्यालयाच्या जागी बहुमजली वाहनतळ उभारण्यात यावे ही देखील मागणी करण्यात आली. खासदार सुळे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत यासाठी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
 इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांवर अवलंबून आहे. माढा, माळशिरस  तालुक्याच्या सीमेवरील असणारे ग्राहक दळणवळणाची सोय असल्याने इंदापूरला येतात. मात्र करमाळा तालुक्यातील ग्राहकांना इंदापूरला येण्यासाठी सोय नाही. जर हा पूल बांधला तर करमाळ्याच्या सीमेवरील गावे इंदापूरला जोडली जातील, त्याचा फायदा इंदापूरच्या बाजारपेठेला होईल.
– भरत शहा, अध्यक्ष, इंदापूर शहर व्यापारी संघ

हेही वाचा

Back to top button