उदयनराजे, रणजितसिंह महायुतीचे प्रबळ दावेदार | पुढारी

उदयनराजे, रणजितसिंह महायुतीचे प्रबळ दावेदार

हरीष पाटणे

सातारा :  महायुतीने विशेषत: भारतीय जनता पक्षाने सातारा, माढा या दोन्ही मतदारसंघांची लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. गेल्या दोन वर्षांत ज्या पद्धतीचे नेटवर्किंग सातारा व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत भाजपकडून सुरू आहे, ते पाहता सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज श्री. छ. उदयनराजे भोसले व माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खा. रणजितसिंह ना. निंबाळकर हेच महायुतीचे उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे शिर्षस्थ नेते ना. देवेंद्र फडणवीस हे आज बुधवारी सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर असल्याने संभाव्य उमेदवारांना ते ग्रीन सिग्नल देणार का? याविषयी दोन्ही मतदारसंघांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सातारा व माढा लोकसभा मतदारसंघ देशाच्या राजकारणात प्रतिष्ठेचे मानले जातात. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खा. शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द़ृष्टीने हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळेच गेली दोन वर्षे भाजपने या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत डोळ्यांत तेल घालून काम केले आहे. सातत्याने केंद्रीय मंत्र्यांचे दौरे, पंचायत समिती गणनिहाय बैठका, राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभा, राज्य सरकारने केलेल्या कामांची गावनिहाय अंमलबजावणी करणार्‍या बैठका याद्वारे भाजपने दोन्ही मतदारसंघात सतत सातत्याने जागृती ठेवली आहे. अन्य पक्षांच्या तुलनेत भाजपने या दोन्ही लोकसभा मतदारसंघात सातत्यपूर्ण संपर्क ठेवला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे दोन्ही गट यांची तुलना करता भाजपने संपर्क यंत्रणा वेगवान ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यातच सातारा लोकसभा मतदार संघात भाजपला झालेल्या पराभवाचे उट्टे काढायचे आहेत. त्यामुळे भाजपची यंत्रणा आतून कामाला लागली आहे.

दोन दिवसांपूर्वी सातार्‍यात गांधी मैदानावर महायुतीचा मेळावा झाला. यापूर्वी एकमेकांविरोधात निवडणुका लढवणारे गांधी मैदानावरील व्यासपीठावर एकमेकांना तिळगूळ देताना दिसले. महायुतीच्या दृष्टीने ही सर्वात जमेची बाजू ठरली आहे. सद्य स्थितीत सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज श्री. छ. उदयनराजे भोसले हे उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना 1 लाखांच्या फरकाने निवडून आलेल्या खा. उदयनराजेंनी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांची धोरणे देशाला व राज्याला हितकारक असल्याचे सांगत विजयी खासदारकीचा तडकाफडकी राजीनामा देवून भाजप प्रवेश केला होता. त्याचा फटका त्यांना पोट निवडणुकीतही बसला. तरीही उदयनराजेंनी फडणवीसांवरील प्रेम तसूभरही कमी केले नाही. उलट राज्यात जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय तापत राहिला तेव्हा तेव्हा स्ट्राँग मराठा लिडर असलेल्या उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीस यांचीच बाजू घेतली.

पोटनिवडणुकीवेळी राष्ट्रवादी अखंड होती. आता राष्ट्रवादीचा निम्म्याहून अधिक गट महायुतीत आहे. त्यामुळे उदयनराजेंसाठी ही निवडणूक महायुतीने वज्रमूठ मजबूत ठेवली तर अवघड जाणार नाही, असे बोलले जात आहे. त्यातच आजही राज्यात मराठा आरक्षणावरून रान पेटले असताना उदयनराजे हेच भक्कम पर्याय म्हणून निवडणूक काळात राज्यभर भाजपचे हुकूमी शस्त्र म्हणून कामी येणार आहेत. त्यामुळेच सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंची बाजू प्रबळ मानली जात आहे. महायुतीतील दुसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे ही जागा गेल्यास आ. मकरंद पाटील यांचे बंधू व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीन पाटील हे उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जातात. याशिवाय महायुतीतील शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम जाधव व चंद्रकांत जाधव हे दोघेही सातारा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. पुरूषोत्तम जाधव यांना सातत्याने थांबवले जाते, ही त्यांची तक्रार आहे. गत लोकसभा निवडणुकीला व पुन्हा झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शब्द दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जाधव निवडणुकीसाठी किस्ताक घालूनच फिरत आहेत. मात्र, ज्या पद्धतीची बांधणी भाजप नेते आ. जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह भाजपच्या संपूर्ण कोअर टीमने केली आहे ते पाहता सातार्‍याची जागा घटकपक्षाला देण्यास तयार होणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या दौर्‍यात याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात खा. रणजितसिंह ना. निंबाळकर हे महायुतीचे लोकसभेचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. गेल्या साडे चार वर्षात रणजितसिंहांनी सातत्याने या मतदारसंघात हालचाल ठेवली आहे. केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे सातत्याने दौरे आयोजित करून रणजितसिंहांनी लोकसभा मतदारसंघात पहिल्याच टर्ममध्ये हवा निर्माण केली आहे. मुळातच शरद पवार ज्या मतदारसंघाचे खासदार होते त्या मतदारसंघाचे खासदार म्हणून रणजितसिंहांनी दिल्लीतही आपला जम बसवला आहे. केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांचे सातत्याने दौरे या मतदारसंघात झाले आहेत. विकासकामांची उद्घाटने करून रणजितसिंहांनी वातावरण गरम करून ठेवले आहे. मात्र, रणजितसिंह मोहिते-पाटील व रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्यातील अंतर्गत वितुष्ट ही सध्या या मतदारसंघातील चर्चेची गोष्ट आहे. दोन्ही रणजितसिंहातील वाद मिटवण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी होणार का? त्यावर या मतदारसंघाचे गणित अवलंबून आहे. राजकीय तवा गरम झाला असतानाच फडणवीस आज फलटणमध्ये आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात रणजितसिंह ना. निंबाळकर हेच माढा लोकसभा मतदारसंघाचे पुढचे उमेदवार असतील हे जाहीर करून टाकले आहे. फडणवीस फलटणच्या दौर्‍यात त्यावर शिक्कामोर्तब करणार का? याविषयी उत्सुकता आहे.

Back to top button