खोडद येथे उपडाकघर सुरू.. | पुढारी

खोडद येथे उपडाकघर सुरू..

खोडद : पुढारी वृत्तसेवा : खोडद येथे नवीन उपडाकघर मंजूर करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन खा. डॉ. अमोल कोल्हे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. खोडद येथे मुक्ताई सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी डाकघरासाठी विशेष साहाय्य केल्याबद्दल ज्येष्ठ कार्यकर्ते पोपटराव एरंडे, बाबूलाल तांबोळी, संजय चौधरी व काही प्रातिनिधिक सुकन्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना खा. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, शासकीय व्यवस्था सर्वसामान्य जनतेच्या करातून चालत असते, त्यानुसार भारतीय डाकघर विभागाच्या वतीने खोडद येथे सुधारित उपडाकघर सुरू झाले आहे.

ते कोणत्याही सरकारच्या अथवा राजकीय पक्षाच्या निधीतून झालेले नाही. कोणत्याही प्रकारच्या घडामोडींमुळे या पोस्ट कार्यालयाला मिळालेला पिनकोड क्रमांक कधीच बदलणार नाही. इतिहासात नोंद घेतली जाईल अशा प्रकारची वेगळी ओळख गावाने निर्माण केली आहे, असे मत देखील खा. डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले. या वेळी खोडदच्या उपसरपंच सविताताई गायकवाड, जीएमआरटी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आशाताई बुचके, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांची या प्रसंगी भाषणे झाली. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष रवींद्र वामन यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन माजी अध्यक्ष रोहिदास डोके व रेखा गोडघासे यांनी केले. ग्रामविकास मंडळाचे संचालक सुदाम गायकवाड यांनी आभार मानले.

हेही वाचा

Back to top button