सातपूर :पुढारी वृत्तसेवा; सातपूर कॉलनी आनंद छाया येथील साईबाबा मंदिरातून निघणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी कायमस्वरूपी ८ किलो वजनाची चांदीची पालखी बनविण्यात आली आहे. ही पालखी सोमवारी मकरसंक्रातीचे औचित्य साधत सराफाच्या दुकानातून विधिवत पूजाअर्चा करून सवाद्य मिरवणूकिने मंदिराकडे नेण्यात आली आहे. गुरुवारी (दि.१७) या पालखीची मंदिरात विधिवत स्थापना करण्यात येणार आहे.
आनंद छाया येथील दक्षिणेश्वर साईबाबा मंदिराच्या वतीने दरवर्षी पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो. या पालखी सोहळ्यात पंचक्रोशीतील शेकडो भाविक सहभागी होतात. मंदिर विश्वस्त व भाविकांच्या वतीने पालखी सोहळ्यात कायमस्वरूपी चांदीची असावी असा माणस व्यक्त करण्यात आला होता. सन २०२१ पासून त्यासाठी लोकवर्गणी गोळा करण्याचे काम सुरु होते. अनेक दानशूर व्यक्तींनी रोख तर काहींनीचांदीच्या स्वरूपात मदत केली. त्याला आज मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. सातपूर येथील दंडगव्हाळ सराफाने ही पालखी बनविली आहे.
दरम्यान, सोमवारी मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सराफ दुकानात विधिवत पूजाअर्चा करून पालखी मंदिराकडे नेण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके, शिवजन्मोत्सवाच्या माजी कार्याध्यक्ष गीता संजय जाधव, राजेश खताळे, सागर नागरे, राजू पाटील, हेमंत नाईक यांच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी साईभक्त उपस्थित होते.
हेही वाचा :