प्रवासी धावपट्टीवर जेवलेच कसे? मुंबई विमानतळासह इंडिगोला नोटीस | पुढारी

प्रवासी धावपट्टीवर जेवलेच कसे? मुंबई विमानतळासह इंडिगोला नोटीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागरी उड्डाण मंत्रालयाच्या विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (BCAS) इंडिगो आणि मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर प्रवाशांचा जेवण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोमवारी मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

दोन्ही नोटिसांच्या बाबतीत, १६ जानेवारीला म्हणजे आजच उत्तर मागितले आहे. दिलेल्या मुदतीत उत्तर न दिल्यास आर्थिक दंडासह कार्यवाही सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नोटीसमध्ये काय आहे?

मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोमवारी रात्री मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर आज सकाळी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मंत्रालयाने या घटनेसाठी मुंबई विमानतळ आणि इंडिगो या दोघांनाही जबाबदार धरले आहे. परिस्थितीचा अंदाज घेण्यास आणि विमानतळावर प्रवाशांसाठी योग्य सोयीची व्यवस्था करण्यात सक्रिय नसल्याबद्दल, त्यांना दोष दिला आहे. मुंबई विमानतळ हे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) द्वारे चालवले जाते.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये प्रवासी विमानतळाच्या धावपट्टीवर बसलेले दिसत आहेत. धावपट्टीवर सर्व प्रवासी रात्रीचे जेवण करताना दिसतात. प्रत्यक्षात इंडिगोच्या गोवा-दिल्ली विमानाला उशीर झाल्याने मुंबई विमानतळावरील प्रवाशांना धावपट्टीवर बसून जेवण करावे लागले.

इंडिगोने मागितली होती माफी

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंडिगोने स्पष्टीकरण दिले होते. १४ जानेवारी रोजी गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E2195 च्या घटनेची माहिती आहे. दिल्लीतील दृश्यमानता कमी असल्याने विमान मुंबईकडे वळवण्यात आले. आम्ही आमच्या प्रवाशांची मनापासून माफी मागतो, असे इंडिगोने म्हटले होते.

हेही वाचा : 

Back to top button