आता पुण्यातही उभारणार गगनचुंबी इमारती: 19 प्रकल्पांना मान्यता | पुढारी

आता पुण्यातही उभारणार गगनचुंबी इमारती: 19 प्रकल्पांना मान्यता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबईप्रमाणेच पुणे शहराच्या उपनगरांतही आता गगनचुंबी इमारती उभ्या राहात असून महापालिकेने प्रथमच बोपोडीमध्ये 160 मीटर म्हणजेच 40 मजली इमारत उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याशिवाय 100 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या 19 इमारत प्रकल्पांनाही मंजुरी दिली आहे. शहराची लोकसंख्या वाढत असताना राज्य सरकारने वेळोवेळी हद्दवाढ केलेली आहे. यामध्ये 1997 मध्ये 23 गावे घेतली, त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये 2021 पर्यंत 35 गावांचा समावेश शहरात करण्यात आला.
हद्दवाढ होत असताना या उपनगरांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी अनेक मोठ्या बांधकाम प्रकल्पांचे कामही हाती घेतले आहे. शहरात खराडी, वडगाव शेरी, बाणेर, बालेवाडी या भागांत आयटी कंपन्यांची संख्या जास्त असल्यानेच याच भागात सर्वाधिक सदनिका घेण्याचेही प्रमाण जास्त आहे. रस्ता रुंदी आणि भूखंडाचे क्षेत्रफळ विचारात घेऊन 70 मीटरपेक्षा जास्त उंच इमारत बांधण्यासाठी काही अटींवर परवानगी देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून प्रस्तावांची छाननी करून प्रकल्पांना मान्यता दिली जात होती.
मध्यंतरी हे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली हायराइज कमिटीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत बोपोडीतील  उंच म्हणजे 160 मीटर उंचीच्या 40 मजली इमारतीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. संगमवाडी, बिबवेवाडी, औंध, येरवडा आदी भागांत यापूर्वी 100 मीटरच्या आतील बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवार आणि सोमवार पेठेत प्रत्येकी 82.5 मीटर आणि 104 मीटरच्या उंचीच्या इमारतींना परवानगी दिली आहे.

भाग आणि प्रकल्प संख्या

बाणेर – 5, बालेवाडी – 5, खराडी – 4, वडगाव शेरी – 4, बिबवेवाडी – 3, एरंडवणे – 3, गुलटेकडी -3, येरवडा- 2, मुंढवा- 2, संगमवाडी – 1, शुक्रवार पेठ- 1, औंध – 1, कोंढवा- 1, वानवडी – 1, घोरपडी – 1, मंगलदास रस्ता – 1, महंमदवाडी – 1, बोपोडी – 1, सोमवार पेठ -1.

उंचीनिहाय परवानग्या

  • 126 मीटरपेक्षा जास्त – 2
  • 100 ते 125 मीटर – 17
  • 90 ते 99 मीटर – 9
  • 90 मीटरपेक्षा कमी उंचीच्या इमारती – 13
शहरात उंच इमारती बांधण्याचे प्रमाण वाढत आहे. 24 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यावरील तसेच सर्व निकषांची पूर्तता करत असलेल्या बांधकाम प्रकल्पांना परवानगी दिली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत चार प्रस्तावांना मान्यता दिली आहे. या बांधकाम प्रकल्पांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणी करून या पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक आहे.
– विक्रम कुमार,  आयुक्त, महापालिका
हेही वाचा

Back to top button