ग्रीसमध्ये सापडले 2700 वर्षांपूर्वीच्या मंदिराचे अवशेष | पुढारी

ग्रीसमध्ये सापडले 2700 वर्षांपूर्वीच्या मंदिराचे अवशेष

अथेन्स : ग्रीसमधील पुरातत्त्व संशोधकांनी 2700 वर्षांपूर्वीच्या एका भव्य मंदिराचे अवशेष शोधून काढले आहेत. त्यामध्ये घोड्याच्या नालेच्या आकारातील एक वेदी होती ज्यावर देवाला बळी किंवा विविध वस्तू अर्पण केल्या जात होत्या.

विटांनी बनलेले हे मंदिर तीस मीटर लांबीचे होते. अमारिसिया आर्टेमिसच्या मंदिरासमोरच त्याचे स्थान होते. अमारिसिया आर्टेमिस हे ठिकाण ग्रीक देवी आर्टेमिसला समर्पित होते. हे ठिकाण 2017 मध्ये शोधण्यात आले होते. इव्हिया बेटावर हे ठिकाण आहे. आता त्याच्यासमोरच्या भागातच या प्राचीन मंदिराचे अवशेष आढळले आहेत. याबाबतची माहिती ग्रीसच्या सांस्कृतिक मंत्रालयाने दिली आहे.

या मंदिरामध्ये अनेक वेगवेगळ्या रचना होत्या व हेच त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. या रचनांमध्येच मंदिरातील वेदीचाही समावेश होतो. तिथे मातीची भांडी व अन्य अनेक वस्तूंचे अवशेष सापडले आहेत. तसेच प्रवाळे आणि अंबर जडवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचाही याठिकाणी शोध घेण्यात आला. प्राण्यांच्या अनेक छोट्या मुर्तीही इथे आढळून आल्या.

Back to top button