भारतात पहिल्यांदाच दिसले तपकिरी तिबेटी अस्वल! | पुढारी

भारतात पहिल्यांदाच दिसले तपकिरी तिबेटी अस्वल!

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (टि्वटर) वर भारतीय वनविभागाचे अधिकारी परवीन कासवान यांनी एका अस्वलाचे फोटो शेअर केले आहेत. हे अस्वल सामान्य नसून ते तपकिरी रंगाचे तिबेटी अस्वल आहे. भारतात असे अस्वल प्रथमच आढळल्याचे कासवान यांनी म्हटले आहे. सिक्कीम वन विभाग आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाच्या कॅमेर्‍यांनी सिक्कीमच्या डोंगराळ भागात या दुर्मीळ अशा तिबेटन ब्राऊन बियरची छबी टिपून घेतली.

कासवान यांनी सोशल मीडियात म्हटले आहे की ‘तुम्ही दुर्मीळ तिबेटी तपकिरी अस्वलाचा पहिला फोटो पाहत आहात. यासह भारतीय वन्यजीवांमध्ये आणखी एका उपप्रजातीची भर पडली आहे. सिक्कीम वन विभाग आणि डब्ल्यूडब्ल्यूएफच्या संयुक्त प्रयत्नाने सिक्कीमच्या उंच भागात या प्राण्याचा शोध लावण्यात आला. याचा अर्थ भारताचा बराचसा भाग अजूनही शोधायचा बाकी आहे. पुचुंग ल्चेनपा, मंगन जिल्ह्यातील उंच भागात हे कॅमेरे बसवण्यात आले होते.

या कॅमेर्‍यांनी डिसेंबर 2023 मध्ये रात्रीच्या अंधारात या अस्वलाचे फोटो टिपले. हे अस्वल अनेक बाबतीत हिमालयात आढळणार्‍या काळ्या अस्वलापेक्षा वेगळे आहे. ते गवताळ प्रदेशात आढळते आणि वनस्पती हा त्याचा मुख्य आहार असतो. अशी अस्वले नेपाळ, भुतान आणि तिबेटच्या पठारावर आढळतात. दक्षिण आशियात पश्चिम हिमालय, काराकोरम, हिंदुकुश, पामीर, पश्चिम कुनलुन शान आणि तियान पर्वतरांगांमध्येही या अस्वलाची संख्या मोठी आहे.

Back to top button