देवदर्शनाचा बहाणा करुन त्याने पत्नीला..; दृश्यम स्टाईल गुन्ह्याचा छडा | पुढारी

देवदर्शनाचा बहाणा करुन त्याने पत्नीला..; दृश्यम स्टाईल गुन्ह्याचा छडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ती अडतीस वर्षांची आणि तो अठ्ठावीस वर्षांचा… आठ महिन्यांपूर्वी घरच्यांनी दोघांचे लग्न लावून दिले. मात्र, हे लग्न त्याला पटले नव्हते. त्याने पत्नीपासून विभक्त होण्याचे ठरवले. मात्र, ती तयार नव्हती. त्यातूनच त्याने पत्नीचा काटा काढून ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सर्व काळजी घेतली. मात्र, त्याचा हा बनाव पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही आणि अखेर पोलिसांनी त्याला पत्नीच्या खूनप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.

पत्नीला देवदर्शनाच्या बहाण्याने सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी परिसरात नेल्यानंतर तिचा दरीत ढकलून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी दरीत पडल्यानंतर ती झाडात अडकली. त्यानंतर तरुणाने साडीने तिचा गळा आवळून खून केला. ललिता अमोलसिंग जाधव (वय 38, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अमोलसिंग मुरली जाधव (वय 28) याला अटक केली आहे.

पोलिस हवालदार प्रताप आव्हाळे यांनी याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोलसिंग हा मूळचा यवतमाळचा. फुलगाव परिसरात तो पत्नीसह वास्तव्यास होता. त्याने 29 ऑक्टोबर 2023 रोजी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. अमोलसिंगने दिलेल्या माहितीनुसार पोलिस बेपत्ता झालेल्या ललिताचा शोध घेत होते. त्यानंतर पोलिसांना तपासात महत्त्वाची माहिती मिळाली. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली. अमोलसिंगने कुटुंबीयांच्या दबाबामुळे वयाने मोठी असलेल्या ललिताशी विवाह केला होता. दोघांमध्ये दहा वर्षांचे अंतर होते. त्याचे पत्नीशी वाद व्हायचे. वयाने मोठी असल्याने पत्नीला त्याने सोडचिठ्ठी देण्यास सांगितले होते. मात्र, ललिताने सोडचिठ्ठी देण्यास नकार दिल्याने तो तिच्यावर चिडला होता. त्यांच्यात कायम वाद व्हायचे. 28 ऑक्टोबर 2023 रोजी भाडेतत्त्वावर मोटार घेऊन दोघे जण सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीच्या दर्शनासाठी निघाल्याचे सांगून बाहेर पडले.

मांढरदेवी परिसरात पोहोचल्यानंतर त्याने मोटारचालकाला मोटार वाहनतळावर लावण्यास सांगितले. त्यानंतर नवस असल्याचे सांगून दोघेजण घाटातून चालत निघाले. घाटात ललिताशी गप्पा मारण्याचा बहाणा केला.
दरीजवळ थांबलेल्या ललिताला त्याने धक्का दिल्याने ती दरीत कोसळली. दरीत कोसळल्यानंतर ती झाडाच्या फांदीत अडकली. अमोलसिंग दरीत उतरला. साडीने गळा आवळून तिचा खून केला.

ती मरण पावल्याची खात्री केल्यानंतर मृतदेह दरीत ढकलून तो पसार झाल्याची माहिती तपासात उघड झाली. त्यानंतर तो कॅबने परत आला होता. या वेळी कॅबचालकाने पत्नीबाबत विचारले असता, त्याने ती तिच्या नातेवाइकांसोबत गेल्याचे सांगितले होते. ही कामगिरी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराडे, विजयकुमार मगर, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काइंगडे, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलिस उपनिरीक्षक रेशीम कोळेकर, पोलिस अंमलदार प्रकाश आव्हाळे, स्वप्निल जाधव, अजित फरांदे यांनी केली आहे.

सीडीआरमुळे प्रकार उघडकीस

लोणीकंद पोलिस ठाण्याचे पथक वाईच्या घाटात गेले. त्यांनी 200 ते 250 फूट खोल दरीत उतरून शोध घेतला. अडीच महिन्यांपूर्वी मृत्यू झाला असल्याने पोलिसांनी तेथे केवळ सांगाडा, तिची चप्पल, साडी व बांगड्या मिळाल्या. या सांगाड्याचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सीडीआरमुळे प्रकार उघडकीस आला.

संशय वाढला अन्  तो जाळ्यात अडकला

अत्यंत थंड डोक्याने व नियोजनबद्ध पद्धतीने दृष्यम स्टाईलने त्याने हा कट रचून खून केला होता. आपला मोबाईल हरविला असल्याचा बहाणा केला. त्या दिवशी कंपनीत दिवसभर उपस्थित असल्याचे गेटवर रेकॉर्डही तयार केले. पोलिसाबरोबर तो शोधाला मदतही करत होता. पण, शेवटी पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढला. त्यात त्या दिवशी त्याचा मोबाईल वाई परिसरात असल्याचे दिसून आले. शिवाय ते सीमकार्ड दुसर्‍या हँडसेटमध्ये टाकून तो वापरत असल्याचे दिसून आले. त्यावरून संशय वाढला अन् तो जाळ्यात अडकला.

 

हेही वाचा

Back to top button