

सिडनी : 'एप' म्हणजे सोप्या भाषेत 'बिनशेपटीचे माकड'! त्यामध्ये चिम्पांझी, गोरिला, ओरांगऊटान यांच्यासह माणसाचाही समावेश होतो! जगाच्या पाठीवर एकेकाळी अतिशय मोठ्या आकाराची 'एप' प्रजाती वावरत होती. तिचे नाव होते 'गिगँटोपिथेकस ब्लॅकी'. संक्षेपात त्यांना 'गिगँटो' असे म्हटले जाते. ही प्रजाती 2 लाख 15 हजार वर्षांपूर्वी लुप्त झाली. हवामान बदलामुळे त्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याचे कारण त्यामागे होते. हे वानर दहा फूट उंचीचे आणि 270 किलो वजनाचे होते!
या 'एप' प्राण्यांबाबत ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांकडून एक नवे संशोधन करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी या प्राण्याच्या दातांचा वापर केला. त्याची माहिती 'नेचर' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार गिगँटो हे 2,95,000 ते 2,15,000 वर्षांपूर्वीच्या काळात नष्ट झाले. सात लाख वर्षांपूर्वी हवामान बदल होऊन परिस्थिती बदलू लागली. नव्या परिस्थितीशी मिळतेजुळते घेण्यात, त्यानुसार आहार व वर्तन करण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे हळूहळू त्यांचा र्हास होत गेला.
एकेकाळी सध्याच्या चीनमध्ये घनदाट अरण्यात ही प्रजाती राहत होती. ही प्रजाती सर्वप्रथम वीस लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. जर्मन पॅलिओंटोलॉजिस्ट गुस्ताव व्होन कोनिंग्सवाल्ड यांनी 1935 मध्ये तिचा शोध लावला. या प्राण्याचे त्यावेळेपासून केवळ दात किंवा जबड्याच्या हाडाचा अंशतः भागच सापडलेला आहे. त्याचा संपूर्ण सांगाडा सापडलेला नाही. बदलत्या नैसर्गिक परिस्थितीत तग धरून राहता न आल्याने ते नष्ट झाल्याचे नव्या संशोधनात म्हटले आहे.