सांगली : प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या | पुढारी

सांगली : प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या

कुपवाड; पुढारी वृत्तसेवा : नात्यातील मुलीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून अवघ्या 19 वर्षांच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने कुपवाड आणि परिसर हादरला. घरातून बोलावून नेले आणि पोटात, डोक्यात चाकू व कोयत्याने सपासप वार केले. रविवारी रात्री ही घटना घडली. ओम श्रीधर देसाई (वय 19, सध्या रा. दत्तनगर, बामणोली, मूळ गाव अलकुड (एस, ता. कवठेमहांकाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण व कुपवाड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

ओंकार नीलेश जावीर (20), सोहम शहाजी पाटील (20, दोघेही रा. दत्तनगर, बामणोली) व रोहित बाळासाहेब केंगार (19, रा. दत्तनगर, बामणोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील चौथा संशयित अल्यवयीन आहे. त्याला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दिलेली आणि घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, ओम हा हार्डवेअर दुकानात कामाला होता. तो, आई, वडील, दोन भाऊ असे पाचजणांचे कुटुंब दत्तनगरमधील भाड्याच्या खोलीत राहते. त्याची ओंकार जावीर याच्याशी मैत्री होती. ओंकारच्या नात्यातील मुलीबरोबर त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. याची माहिती या दोन्हीही कुटुंबांना होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ओंकारने ओमला या प्रेमप्रकरणाचा जाब विचारला होता. त्यामुळे दोघांत वादावादीही झालेली. रविवारी रात्री ओंकारने ओमला दत्तनगरमधील खुल्या भूखंडावर बोलावले. तेथे चौघेही संशयित होते. ओंकारने ओमच्या पोटात चाकूचे सपासप वार केले. सोहमने कोयत्याने त्याच्या डोक्यात वार केले. या हल्ल्यात ओम रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्ला झाल्यानंतर तो आरडाओरड करू लागला. त्याठिकाणी गर्दी जमू लागली. त्यामुळे संशयितांनी पळ काढला. लोकांच्या आवाजाने जखमी ओमचे दोघे भाऊ घटनास्थळी आले. त्यांनी त्याला तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ओमचा भाऊ आदेशने संशयितांच्या विरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

काही तासातच तिघांना अटक

मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक, कुपवाड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक संशयितांच्या शोधासाठी रवाना झाले. पथकातील हवालदार इम्रान मुल्ला यांना दोघे संशयित कवलापूर-तासगाव रस्त्यावरील ओढ्यालगत थांबल्याची माहिती मिळाली. त्यांनी ओंकार व सोहमला अटक केली. त्यांनी खुनाची कबुली दिली. तिसरा संशयित रोहितला कुपवाड पोलिसांनी अटक केली. संशयितांना न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडी दिली. यातील चौथा अल्पवयीन संशयित फरार होता. त्याला रात्री उशिरा ताब्यात घेतले.

Back to top button