Vegetables Market : राजस्थानी गाजर अन् मध्यप्रदेशातील मटारची चलती | पुढारी

Vegetables Market : राजस्थानी गाजर अन् मध्यप्रदेशातील मटारची चलती

शंकर कवडे

पुणे : भोगी अन् मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि. 14) फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामध्ये, राजस्थान येथून गाजर आणि मध्यप्रदेशातून मटारची मोठी आवक झाली. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने आवक वाढूनही गाजर व मटारच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली.

ढगाळ वातावरणामुळे पोषक वातारण निर्माण होऊन उत्पादनात वाढ झाल्याने बाजारात टोमॅटो, काकडी व घेवड्याच्या आवकेतही चांगली वाढ झाली. परिणामी, त्यांच्या भावात दहा टक्कयांनी घसरण झाली. रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 125 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक 25 ट्रकने वाढली. तर, आवकेसह मागणीही वाढल्याने बहुतांश फळभाज्यांचे भाव टिकून होते, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 10 ते 12 टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 8 ते 10 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा 4 ते 5 टेम्पो, भुईमुग शेंग कर्नाटक येथून 2 टेम्पो, मध्य प्रदेश व राजस्थान येथून 24 ते 24 ट्रक मटार, कर्नाटक येथून 4 ते 5 टेम्पो पावटा, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे 5 ते 6 टेम्पो आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 600 ते 700 गोणी, भेंडी 8 ते 10 टेम्पो, गवार 8 ते 10 टेम्पो, टोमॅटो सुमारे 14 ते 15 हजार क्रेट, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 10 ते 12 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 7 ते 8 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, पावटा 5 ते 6 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, शेवगा 2 ते 3 टेम्पो, घेवडा 5 ते 6 टेम्पो, कांदा सुमारे 90 ते 100 ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 60 ते 65 टेम्पो इतकी आवक झाली.

पालेभाज्यांचे भाव टिकून

मार्केट यार्डातील तरकारी विभागात बहुतांश पालेभाज्यांची आवक जावक कायम असल्याने पालेभाज्यांचे गत आठवड्यातील दर टिकून होते. रविवारी (दि. 14) कोथिंबिरीची तब्बल दीड लाख जुडी, मेथीची 50 हजार जुडी तर हरभरा गड्डीची 20 ते 22 हजार गड्डी इतकी आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरी, मेथीची आवक स्थिर राहिली. तर, हरभरा गड्डीची आवक दहा हजार जुड्यांनी वाढली. घाऊक बाजारात एका जुडीची 3 ते 15 रुपये तर किरकोळ बाजारात 10 ते 30 रुपये दराने गड्डीची विक्री सुरू होती.

हेही वाचा

Back to top button