ही गोष्ट आहे, पुणे वेधशाळेतील हवामान देवतेची; 95 वर्षांचा इतिहास | पुढारी

ही गोष्ट आहे, पुणे वेधशाळेतील हवामान देवतेची; 95 वर्षांचा इतिहास

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे हवामान विभागाच्या तीनमजली मजबूत दगडी इमारतीवर अग्रभागी हवामान देवतेचे शिल्प असून ते तब्बल 95 वर्षांनंतरही सुस्थितीत असून इमारतीच्या सौंदर्यात भर घालणारेच आहे. या शिल्पाचा इतिहास मात्र जतन झालेला नाही. सोमवारी 15 जानेवारी रोजी हवामान विभागाचा 150 वा वर्धापन दिन देशभरातील त्यांच्या कार्यालयात साजरा होत आहे. पुणे हवामान विभागाची इमारत ही वारसाहक्क स्थळ (हेरिटेज) आहे.

1928 मध्ये इंग्रज गर्व्हनर विल्यम्स याच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन झाले. ही इमारत भारतीय कंत्राटदार पालनजी एडलूजी यांनी बांधली आहे. त्यांनी संपूर्ण इमारत साकारल्यावर तिच्या वरच्या टोकावर एक सुंदर शिल्प साकारले आहे. एक स्त्री पृथ्वीवर बसलेली असून ती आकाशविहार करतेय असे हे पांढऱ्या रंगाचे शिल्प आहे. उत्सुकतेपोटी या शिल्पाची माहिती विचारली असता कर्मचार्‍यांनी सांगितले की, या शिल्पाबाबत काही नोंद सापडत नाही. मात्र ही हवामान देवता आहे असे बोलले जाते.

इमारतीवरचे शिल्प हवामान देवतेचे असावे असा अंदाज आहे. ही इमारत फारसी अभियंत्याने बांधली आहे. त्याच्या कल्पनेतून हे सुंदर शिल्प साकरले असावे असे वाटते. मात्र याबाबत कुठे नोंद सापडत नाही. हे शिल्प इमारतीच्या खूप उंच भागावर असल्याने ते दगडाचे आहे की आणखी कोणते तंत्र वापरले हे समजत नाही. पण ते आजही सुस्थितीत असून इमारतीचे सौंदर्य खुलवणारेच आहे.
डॉ. कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, आयएमडी, पुणेपोस्टाची पेटी इतिहासाच्या खुणा शिवाजीनगर भागात सुमारे 8 एकर परिसरात मध्यभागी इंग्रजांनी ही इमारत बांधली.

त्यानंतर या ठिकाणी भारत सरकारने पुढच्या काळात विस्तार केला. तेथे एकूण चार इमारती आहेत. त्यात एका कोपर्‍यात बंद पडलेले पोस्ट ऑफिस अन् लाल रंगाची पेटी आजही आहे. मागच्या बाजूला पश्चिमेकडे पोस्ट ऑफिस अनेक वर्षे हवामान विभागात होते. संपूर्ण भारतात येथूनच हवामानाचा डेटा संकलित केला जात असल्याने तो पोस्टाने देशभरातील विविध कार्यालयांना पाठवला जात असे मात्र इंटरनेट आले आणि ही सेवा बंद झाली.

आज हवामान उपकरणांचे प्रदर्शन

सोमवार, दि. 15 जानेवारी रोजी भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. इमारतीला रविवारी सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली. सोमवारी सकाळी 9.30 ते दुपारी 12 पर्यंत या ठिकाणी हवामानाच्या यंत्रांची माहिती दाखविणारे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button