राजगडावर बेकायदा खाद्यपदार्थ विक्री; दहा जणांवर गुन्हे | पुढारी

राजगडावर बेकायदा खाद्यपदार्थ विक्री; दहा जणांवर गुन्हे

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : राजगड किल्ल्यावर खाद्यपदार्थांची विक्री करण्यास मनाई असताना गडाच्या ऐतिहासिक वास्तूंत बेकायदा खाद्यपदार्थ शिजवून त्याची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर पुरातत्त्व विभाग व वेल्हे पोलिसांनी रविवारी धडक कारवाई केली. याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात दहा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गडावरील पद्मावती माचीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजसदर, अंबरखाना तसेच ऐतिहासिक वास्तूंत राजरोसपणे खाद्यपदार्थांची विक्री सुरू आहे. गडाच्या परिसरात प्लास्टिक कचरा वाढला होता. कचरा, खाद्यपदार्थांच्या राडारोड्यांमुळे गडाच्या ऐतिहासिक वास्तूंचे होत असलेले विद्रुपीकरण रोखण्यासाठी पुरातत्त्व विभागाने विक्रेत्यांना वांरवार सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत विक्री सुरू होती, असे पुरत्त्व विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहने यांनी याबाबत वेल्हे पोलिस ठाण्याला पत्र दिले होते. सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे यांच्या पथकाने गडावर धाव घेतली. पोलिस पथकासह पुरत्त्वत विभागाचे सहायक अधिकारी हेमंत गोसावी तसेच पाहरेकरी बापू साबळे, विशाल पिलावरे, आकाश कचरे आदी सुरक्षारक्षक कारवाईत सहभागी झाले होते.

पुरातत्त्व विभागाच्या तक्रारीनुसार गडावर बेकायदा खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

-रणजित पठारे, सहायक पोलिस निरीक्षक

खाद्यपदार्थ विक्रीस परवानगी देण्याची मागणी

सिंहगड किल्ल्यावर अनेक वर्षांपासून स्थानिक रहिवासी खाद्यपदार्थांची विक्री करत आहेत. त्याप्रमाणे राजगडावर स्थानिकांना खाद्यपदार्थ विक्री करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा

Back to top button