उदयोन्मुख दादा, भाऊंसाठी पोलिसांचा मास्टर प्लॅन; रायझिंग गँगची कुंडली तयार

उदयोन्मुख दादा, भाऊंसाठी पोलिसांचा मास्टर प्लॅन; रायझिंग गँगची कुंडली तयार

पुणेः शहरातील रायझिंगस्टारच्या ( उदयोन्मुख दादा, भाऊ) बंदोबस्तासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, गुन्हे शाखेने त्यासाठी खास मास्टर प्लॅन तयार केला आहे. शहरात 21 रायझिंग स्टारच्या टोळ्या असल्याची नोंद पोलिसांकडे आहे. प्रत्येक टोळीची जबाबदारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या टोळ्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात, त्यासाठी विशेष टिम तयार करण्यात आली असून, गुन्हेगारांच्या खात्यावर करडी नजर ठेवली जाते आहे. त्यामुळे गुन्हेगारीला उत्तेजन देणारी तुमची एखादी पोस्ट तुम्हाला कारागृहाची हवा खाण्यासाठी पाठवू शकते.

वय वर्ष वीस..ओठावर नुकतेच मिसरूड फुटलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने पिस्तूलातून गोळ्या झाडून शरद मोहोळचा खून केला. शिक्षण घेण्याच्या वयात त्याला गुन्हेगारीचे प्रचंड आकर्षण असल्याचे त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या रिल्समधून दिसून येते. त्यामुळे एकीकडे पुर्वीच्या टोळ्यातील संघर्ष शमला असताना, आपण भाई होऊ या नादात त्यांना आदर्श मानून गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवणार्‍या उदयोन्मुख दादा, भाऊ सक्रिय झाल्याचे दिसते. दरम्यान हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर रायझिंग टोळ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

गेल्या काही वर्षात गुन्हेगारांना हिरोच्या रुपात आपला आदर्श मानणारी तरुणांची एक पिढीच समाजात निर्माण झाली आहे. ही पिढी स्वतःच्या छोट्या मोठ्या गुन्हेगारी टोळ्या निर्माण करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे. गुन्ह्यात अडकल्यानंतर बडे गुन्हेगार अशा तरुणांना आश्रय अन् पैसा पुरवत असल्याचे समजते. एकदा का तो सराईत झाला की त्याचा पुढे सोईस्कर वापर केला जातो. पुढे त्यातूनच जन्म होतो तो कथीत भाई..दादा..अन् भाऊंचा..!

जास्त गुन्हे तेवढे वजन

मागील काही दिवसात शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा आढावा घेतला तर गुन्ह्यात तरुणांचा सहभाग अधिक असल्याचे दिसते. टोळ्यांचे दादा व पंटर लोकांचा वस्तीत असलेला दबदबा, कमी कालावधीत आलेल्या ऐशोआरामाच्या गोष्टी, यामुळे अनेक तरुण मुले त्यांना आपला आदर्श मानत असल्याचे चित्र आहे. त्यांच्या एका शब्दावर मागचा पुढचा विचार न करता सांगतील ती कामेही मुले करतात. गुन्हेगारी विश्वात जेवढे गुन्हे जास्त तेवढे भाईंचे परिसरात वजन असा कयास बांधला जातो. ही गोष्ट तरुणाई आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी नक्कीच लाभदायक नाही.

पोलिस आक्रमक अन् सतर्क

शहर मोहळोच्या खूनानंतर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांच्या बाबत आक्रमक भुमिका घेतली आहे. त्याच्या खूनाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोन वकिलांसह दहा जणांना अटक झाली आहे. शहरात सक्रिय असलेल्या प्रत्येक टोळींच्या हालचालीवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जाते आहे. टोळीतील सदस्यांची झाडाझडती सुरु आहे. त्यांच्या संपर्कात असलेल्यांची यादी पोलिसांनी तयार करण्यास सुरूवात केली असून, त्यांना रसद पुरविणार्‍या ठिकाणांचा शोध घेतला जातो आहे. पोलिस आयुक्त रितेशकुमार, अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे यांच्या सुचनेनुसार सहायक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर, सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक, प्रताप मानकर, अजय वाघमारे, महेश बोळकोटगी, श्रीहरी बहीरट, क्रातीकुमार पाटील यांच्या पथकांकडे या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे.

गुन्हेगारी फॉलोअर्सला दणका

शहरातील कुख्यात गुंडांना फॉलो करणार्‍या व गुन्हेगारीला उत्तेजन देणार्‍या भाईंच्या फॉलोअर्सवर देखील पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीला उत्तेजन देणार्‍या रिल्स, व्हिडीओ आणि पोस्ट तुम्हाला महागात पडू शकतात. त्यामुळे पोस्टच्या माध्यमातून दहशत पसरविणार्‍यांना बिफोर आफ्टरचा दणका बसणार असल्याचे संकेतही पोलिसांनी दिले आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news