लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिर : फडणवीस राहणार उपस्थित | पुढारी

लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिर : फडणवीस राहणार उपस्थित

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : वारकरी, अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात कायम पुढाकार घेणार्‍या आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन नवी सांगवी येथे 5 ते 7 जानेवारीदरम्यान करण्यात आले आहे. या शिबिरप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली. भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने तसेच राज्य शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 ते 7 जानेवारी दरम्यान ‘अटल विनामुल्य महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर करण्यात आले आहे.

सकाळी 10 ते सायंकाळी 10 वेळेत या शिबिरात नागरिकांना सहभागी होता येणार आहे. याबाबत जगताप यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. यावेळी आमदार अश्विनी जगताप, आ. उमा खापरे, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस विलास मडेगिरी, नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार हिंगे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, राजेश पिल्ले आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, स्व. लक्ष्मण जगताप यांनी 9 वर्षांपूर्वी अटल विनामूल्य आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. प्रतिवर्षी लाखो गरजू नागरिक या शिबिराचा घेत आहेत. यावर्षी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की, शहराध्यक्ष शंकर जगताप आणि स्व. लक्ष्मण जगताप मित्र परिवाराने या शिबिरासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. रुग्णसेवेचा हा वसा आम्ही जपण्याचा प्रयत्न करीत आहोत.

हेही वाचा 

Back to top button