पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे येथील ससून रुग्णालयातील तृतीयपंथीय वार्डाच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान एका भाजप आमदाराने पोलिसाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजप आमदार सुनिल कांबळे असे त्यांचे नाव असून त्यांनी ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. (Maharashtra Politics)
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना गर्दी होत असते. कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांकडून हुल्लडबाजीचे, गोंधळ घातल्याचे प्रकार समोर आले आहेत. राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ असणाऱ्या सिल्लोडमध्येही हा प्रकार समोर आला. यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर लाठीमार करण्याचे आदेश देत असताना आक्षेपार्ह भाषा वापरल्याने सत्तार वादात सापडले.
या प्रकरणावरुन व भाजप आमदार सुनिल कांबळे यांनी पोलिसाच्या कानशिलात लगावल्याच्या घटनेवरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी X वर पोस्ट करत निशाणा साधला आहे. त्यांनी त्यांच्या 'X' वर पोस्ट करत म्हटले आहे की, ""काल अब्दुल सत्तार आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी दाखवला सत्तेचा माज. भाजप आमदाराची मस्ती इतकी की ड्युटीवर असलेल्या पोलीस जवानाच्या थोबाडीत हाणली, थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदारमध्ये आली कशी? गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलिस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो."
त्याचबरोबर वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भाजप आमदार सुनिल कांबळे यांनी पोलिस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं होत आहे. दरम्यान सुनिल कांबळे यांनी आपण कानशिलात मारली नसल्याचा खुलासा केला आहे.
शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत म्हटले आहे की,"भाजप आमदार सुनील कांबळे हे कायमच अर्वाच्य आणि शिवराळ भाषा, मारहाण , दादागिरी करण्यासाठी कूप्रसिद्ध आहेत. असे करण्याची त्यांची वारंवार हिंमत वाढत जाते कारण भाजपचा आमदार असल्यामुळे भाजपकडून गुन्हेगारी कृत्यांचे जणू आमदार खासदारांना परमिट मिळाले आहे."
माध्यमांशी बोलत असताना सुनिल कांबळे यांनी या घटनेचा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, "मी मारहाण केलेली नाही". वडेट्टीवार व अंधारे हे दोघेही माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी ही घटना काय आहे हे समजून घेवून बोलावे.
हेही वाचा