पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : लुई ब्रेल या व्यक्तीने ब्रेल लिपीचा शोध लावल्याने दृष्टिहीन व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आला आहे. दृष्टिहीन व्यक्ती मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन स्वावलंबी होत आहेत. अनेक व्यक्ती या मोठ्या पदावरही काम करत आहेत; मात्र हे सर्व करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामध्ये सध्या सतावणारी एक मोठी समस्या म्हणजे भटक्या कुत्र्यांचा होणारा त्रास. दृष्टिहीन असल्याने प्रतिकार न करता आल्यामुळे भटकी कुत्री दृष्टिहिनांवर हल्ला करत चावा घेतात.
आपण दृष्टिहीन व्यक्तींना पांढर्या काठीच्या साहाय्याने प्रवास करताना, रस्त्यावरून चालताना पाहत असतो. पांढर्या काठीच्या सहाय्याने दुसर्याची मदत न घेता स्वावलंबीपणे कुठेही फिरता येते. पांढरी काठी हातात घेतल्यामुळे पुढे येणारे चढउतार, दगडधोंडे, खाचखळगे, कुत्रे-मांजर असे प्राणी, बसलेली-झोपलेली माणसं असे काठीच्या परिक्षेत्रात येणारे सगळेच अडथळे काठीच्या साहाय्याने त्यांच्या सहज लक्षात येतात. परिणामी घरातून बाहेर पडणार्या या व्यक्तींना शाळा- कॉलेज, नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी, किंवा हव्या त्या ठिकाणी जाऊन इच्छित कार्य साध्य करणे आता या पांढर्या काठीमुळे सहजशक्य झाले आहे.
मात्र, भटक्या कुत्र्यांचे असे काही विशिष्ट ठिकाण नसते. भटके कुत्रे कुठेही बसतात. हे दृष्टिहीन व्यक्तींना दिसत नाही. त्यांच्यावर चुकून पाय पडतो आणि कुत्रे चावा घेतात. बर्याचदा दृष्टिहीन व्यक्तींच्या हातातील पांढरी काठी पाहून त्यांना कुत्रे चावा घेतात. अंध व्यक्तींना अनेकदा या समस्येला सामोरे जावे लागते. शाळा, महाविद्यालये, कार्यालये याठिकाणी भटकी कुत्री असतात. जेव्हा कुत्री मागे लागतात दृष्टिहीन व्यक्ती आपल्या संरषणासाठी इतरत्र पळापळ करतात; मात्र या घटनेत त्यांना कशाला तरी धडक बसते जखम होते.
दृष्टिहिनांच्या या समस्येकडे कोणतेही प्रशासन लक्ष देत नाही. श्वानप्रेमी त्यांना खायला देतात; परंतु या भटक्या कुत्र्यांकडून होणार्या उपद्रवाकडे कोणी लक्ष देत नाही, अशी खंत दृष्टिहीन व्यक्ती व्यक्त करत आहे.
मला स्वत:ला आतापर्यंत पाच वेळा कुत्रे चावल्याची घटना घडली आहे. वारंवार अशा घटनांमुळे त्याचे उपचार
घेणेदेखील खूप त्रासदायक असते. दृष्टिहीन व्यक्तींचा चुकून पाय पडला तरी किंवा हातातील काठी पाहून कुत्री अंगावर येतात. श्वानप्रेमी फक्त त्यांची काळजी घेतात. पण त्यांच्यापासून दुसर्यांना होणार्या त्रासाची कधीच दखल घेत नाहीत.– धनंजय भोळे, शैक्षणिक समन्वयक, सर्वसमावेशक शिक्षण व सुगम्यता केंद्र, पुणे विद्यापीठ
हेही वाचा