विद्या प्राधिकरणाला प्रश्नपेढीचा विसर; संकेतस्थळावर गतवर्षीच्याच प्रश्नपत्रिका | पुढारी

विद्या प्राधिकरणाला प्रश्नपेढीचा विसर; संकेतस्थळावर गतवर्षीच्याच प्रश्नपत्रिका

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करता येण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरण विषयनिहाय नमुना प्रश्नसंच ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतात. परंतु, यंदा मात्र अशा प्रकारचे प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. त्यामुळे विद्या प्राधिकरणाला दहावी- बारावीच्या प्रश्नपेढींचा विसर पडला का असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केला आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रत्येक विषयाची चांगल्या पद्धतीने तयारी करण्यासाठी, स्वयंअध्ययन करण्यासाठी विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून नमुना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येतात. त्यानुसार गेल्या वर्षीदेखील बारावीचे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र, इंग्रजी, गणित आणि संख्याशास्त्र (वाणिज्य) इतिहास (मराठी, इंग्रजी), भूगोल (मराठी) या विषयांचे प्रश्नसंच, तर दहावीच्या गणित भाग 1 आणि 2, इतिहास आणि राज्यशास्त्र (मराठी), भूगोल (मराठी, इंग्रजी), कुमारभारती आदी विषयांचे प्रश्नसंच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले होते. मात्र, यंदा अशा प्रकारचे प्रश्नसंच उपलब्ध केल्याचे दिसून येत नाही.

यंदा दहावी-बारावीची परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित आहे. त्यानुसार प्रश्नपेढी तयार करून विद्या प्राधिकरणाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र तसे झालेले नाही. दहावी-बारावीच्या परीक्षा आता अगदी दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊन विद्यार्थी प्रश्नपत्रिकांच्या सरावाकडे वळणार आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांना विद्या प्राधिकरणामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या नमुना प्रश्नपत्रिका उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे विद्या प्राधिकरणाकडून त्या तातडीने उपलब्ध होणे गरजेचे आहे. परंतु जानेवारी महिना सुरू होऊनही नमुना प्रश्नसंच ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध झालेले दिसत नाहीत. त्यामुळे याकडे विद्या प्राधिकणाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा

Back to top button