..त्यांना घरी जाऊन उमेदवारी देऊ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले | पुढारी

..त्यांना घरी जाऊन उमेदवारी देऊ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून येण्याच्या निकषावर उमेदवारी दिली जाणार आहे. पक्षाच्या वतीने करण्यात येणार्‍या सर्व्हेमध्ये ज्याचे नाव येईल, त्याला घरी जाऊन उमेदवारी देऊ. केंद्र आणि राज्यातील सरकारवर जनतेचा रोष आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभेला काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल,’ असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. तसेच ‘जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारे मतभेद नाहीत.

आम्ही एकसंध असून, लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला 40 ते 41 जागा मिळतील,’ असेही ते म्हणाले.
नाना पटोले यांनी बुधवारी पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते बोलत होते. माजी राज्यमंत्री, आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, उल्हास पवार, दीप्ती चवधरी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, शहराध्यक्ष अरविंद शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. पटोले म्हणाले, ‘शरद पवार, मी किंवा उद्धव ठाकरे यांपैकी कोणीही अद्याप जागावाटपासंदर्भात काहीही बोललेलो नाही.

जागावाटपावरून मतभेद असल्याच्या बातम्या निराधार असून, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जागावाटपाचा प्रश्न दिल्लीमध्ये होणार्‍या बैठकीत मार्गी लावला जाणार आहे. जे कोणी भाजपच्या विरोधात लढण्यास तयार आहेत, त्यांना सोबत घेण्याची आमची भूमिका असल्याचे पटोले यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व राजू शेट्टी यांच्या आघाडीतील समावेशाच्या प्रश्नावर स्पष्ट केले. दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाचे उद्या बैठक होणार आहे, या बैठकीत राज्यातील परिस्थितीची माहिती वरिष्ठांना देणार आहे. मी पक्षाचा शिपाई आहे, पक्षाने आदेश दिला तर आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासही तयार असल्याचे पटोले यांनी सांगितले. भाजपेच नेते सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करत असून, भगतसिंह कोश्यारी यांनी केलेला अपमान राज्यातील जनता अजून विसरलेली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित आहे.’

मंदिराचे काम अर्धवट असतानाही त्यामध्ये श्री राममूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा घाट घालण्यात येत असून, रामाचे कंत्राट घेतल्यासारखे भाजपकडून निमंत्रणे वाटली जात आहेत. त्यांच्याकडून रामाला वेठीस धरण्याचे काम सुरू आहे.
धर्मावर बोलण्याचा ठेका कोणा एका पक्षाला नाही, आम्हालाही त्या विषयावर बोलण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असे पटोले यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी राज्यस्थानमधील नागरिकांसाठी साडेचारशे रुपयामध्ये सिलेंडर देण्याची घोषणा केली. ते केवळ एका राज्याचे पंतप्रधान नाहीत, त्यामुळे त्यांनी साडेचारशे रुपयामध्ये संपूर्ण देशातील जनतेला सिलेंडर उपलब्ध करून द्यावे, असेही पटोले म्हणाले.

पटोले उवाच

  • मोटार व्हेईकल कायदा सरकारने कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणला कळत नाही.
  •  समृद्धी रस्त्याचे काम करताना आवश्यक केमिकल वापरले नाही, त्यामुळे वाहनांचे टायर गरम होऊन अपघात होत आहेत.
  •  पेपरफुटीच्या प्रकारामुळे तरुणांचा पैसा व वेळ वाया जात आहे. त्यामुळे पेपरफुटीतील लोकांना जन्मठेप व्हायला हवी.
  •  मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात जे भाषण केले, तेच भाषण हिवाळी अधिवेशनात केले.
  •  सरकारला सामान्यांपेक्षा उद्योजकांची जास्त काळजी.

त्या गोष्टी जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भारत न्याय यात्रा

देशात अराजकतेची राजवट सुरू आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांना हुकूमशाही पद्धतीने निलंबित करण्यात आले आहे. सत्ताधार्‍यांकडून अनेक गोष्टी जनतेपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचू दिल्या जात नाहीत. या गोष्टी जनतेपर्यंत पोहचण्यासाठी राहुल गांधी यांची मणीपूर ते मुंबई अशी भारत न्याय यात्रा काढण्यात येणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button