वर्धापन दिनानिमित्त आज दै. ‘पुढारी’चा स्नेहमेळावा : 86 व्या वर्षात पदार्पण

वर्धापन दिनानिमित्त आज  दै. ‘पुढारी’चा स्नेहमेळावा : 86 व्या वर्षात पदार्पण
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी'च्या पुणे आवृत्तीचा वर्धापन दिन उद्या, बुधवारी (दि. 3 जानेवारी) उत्साहात साजरा केला जाणार आहे. दै. पुढारी 85 वर्षांची वाटचाल पूर्ण करून 86 व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्यानिमित्त स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याला सर्वांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दै. 'पुढारी'चे संस्थापक-संपादक 'पद्मश्री' डॉ. ग. गो. जाधव यांनी दै. 'पुढारी'चे इवलेसे रोपटे लावले. त्याचा आता महावृक्ष बनला आहे. दै. 'पुढारी'ने आपल्या साडेआठ दशकांच्या प्रदीर्घ कालखंडातील अनेक संघर्षांत समाजाचे नेतृत्व केले.

निर्भीड, सडेतोड पत्रकारितेने जनमानसात वेगळाच ठसा दै. 'पुढारी'ने उमटवलाच, पण त्याचबरोबर अनेक सामाजिक कामेही करून आपले दायित्व पार पाडले. काळानुसार बदलत दै. 'पुढारी'ने आधी डिजिटल माध्यमात पाऊल टाकून लक्षणीय कामगिरी केली. त्यानंतर गेल्या वर्षी इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रवेश करून 'पुढारी' समूहाने 'पुढारी न्यूज' ही वृत्तवाहिनी सुरू केली. ती अल्पावधीतच अवघ्या महाराष्ट्रजनांच्या प्रेमाला-कौतुकाला पात्र झाली.

पुढारीच्या वर्धापनदिनानिमित्त मित्रमंडळ चौकाजवळील मॅरेथॉन हॉल गार्डन येथे 3 जानेवारी रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, दै. 'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दै. 'पुढारी'चा वर्धापनदिन म्हणजे, मस्त थंडीची मजा घेत, गरम दुधाचा अन् खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत समाजातल्या विविध क्षेत्रांतील लहानथोरांशी गप्पा मारण्याची मैफल, तसेच दै. 'पुढारी'शी अन् 'पुढारी न्यूज' या चॅनेलशी आपले ऋणानुबंध अधिक वृद्धिंगत करण्याची संधी. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी या मेळाव्यास यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news