चरबी वितळवून तूप बनवणारे रॅकेट उद्ध्वस्त | पुढारी

चरबी वितळवून तूप बनवणारे रॅकेट उद्ध्वस्त

भिवंडी, पुढारी वृत्तसेवा : जनावरांची चरबी वितळवून ते तूप म्हणून विकण्याचा धक्कादायक प्रकार सुरू होता. येथील अशाच एका अड्ड्यावर छापा टाकून वितळलेल्या चरबीचे 15 डब्बे जप्त करण्यात आले. भिवंडी महापालिका प्रशासनाने ही कारवाई केली.

भिवंडी महापालिकेच्या प्रभाग समिती क्र. 4 अंतर्गत येणार्‍या पालिकेच्या कत्तलखान्यात जनावरांची चरबी वितळवून तूप तयार करण्याचे रॅकेट सुरू होते. त्यासंदर्भात अनेक जागरूक नागरिकांनी मनपा प्रशासक आणि आयुक्त अजय वैद्य यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.

त्याची दखल घेत आयुक्त अजय वैद्य यांनी पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी सुदाम जाधव यांना कत्तलखान्याला भेट देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने मंगळवारी सकाळी नियंत्रण अधिकारी सुदाम जाधव, करआकारणी विभागाचे अधिकारी अधीक्षक सायरा अन्सारी यांच्यासह पालिकेच्या सुरक्षा व सफाई कर्मचार्‍यांच्या पथकाने खाडीच्या काठी असलेल्या कारखान्यावर छापा टाकला असता, वितळलेल्या चरबीने भरलेले 15 डबे दिसून आले. त्यावेळी पालिकेची कारवाई पाहून हा प्रकार बनवणार्‍या लोकांनी खाडीत उडी मारून पळ काढला.

Back to top button