सापडलेली अडीच लाखांचा ऐवज असलेली पर्स केली परत | पुढारी

सापडलेली अडीच लाखांचा ऐवज असलेली पर्स केली परत

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  एसटी बसमध्ये सापडलेली सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा जवळपास अडीच लाखांचा ऐवज असलेली पर्स संबंधित महिला प्रवाशास निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील एकाने परत करून प्रामाणिकपणा दाखवून दिला. या कृतीबद्दल परिसरातून त्याचे कौतूक होत आहे. दादासाहेब पाटील (वय 50, रा. पाटीलवस्ती, निमगाव केतकी, ता. इंदापूर) असे या प्रामाणिक व्यक्तीचे नाव आहे. तर अनिता गोसावी यांची पर्स विसरलेली होती. गोसावी या पुण्याहून रविवारी (दि. 31) त्यांच्या माहेरी निमगाव केतकीकडे येत होत्या. इंदापूर बसस्थानकावर उतरून त्या इंदापूर-व्याहाळी एसटीने निमगावात उतरल्या. घरी आल्यानंतर त्यांची सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा जवळपास अडीच लाखांचा ऐवज असलेली पर्स एसटीत विसरल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लागलीच त्यांच्या पर्समधील मोबाईलवर संपर्क केला.

पलिकडून मोबाईल कॉल घेण्यात आला आणि ’आपण घाबरु नका; तुमची पिशवी मला सापडली आहे, असे दादासाहेब पाटील यांनी कळवले. ही पर्स पाटील यांना एसटी बसमध्ये सापडली होती. त्यानंतर पाटील यांनी पर्स गोसावी यांना प्रामाणिकपणे परत केली. यावेळी सुवर्णयुग सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दशरथ डोंगरे, शासकीय ठेकेदार संजय गायकवाड, नितीन गांधी, लक्ष्मण फरांदे, अर्जुन हेगडे आदी उपस्थित होते. या प्रामाणिकपणाबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुषार जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी पाटील यांचे कौतुक केले.

हे ही वाचा :

Back to top button