Pune : बांधकाम साहित्यांची धोकादायक वाहतूक | पुढारी

Pune : बांधकाम साहित्यांची धोकादायक वाहतूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मालवाहतुकीच्या वाहनांमधून बांधकामासाठी आवश्यक असलेले साहित्य प्रमाणापेक्षा जास्त भरून धोकादायकरीत्या वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इतर वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. संबंधित यंत्रणांनी अशा बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शहरातील छोट्या-मोठ्या रस्त्यांवर आणि महामार्गावरील रस्त्यावर अनेक मोठ्या आणि छोट्या ट्रकमधून बांधकामाच्या साहित्याची वाहतूक होत आहे.

प्रमाणापेक्षा जास्त सिमेंट, वाळू, लोखंडी गर्डर यांसह अन्य वस्तूंची सर्रासपणे वाहतूक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी अनेकदा या वस्तू पडून अपघात झाल्याचे समोर आले आहे. अशाच वस्तू पडून इतर वाहनचालकांचे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस, आरटीओने अशाप्रकारे धोकादायक वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

मला कामानिमित्त शहरातून, महामार्गावरून दुचाकीवरून प्रवास करावा लागतो. त्या वेळी अनेक ट्रकचालक वाळू आणि मातीची वाहतूक करताना त्यावर झाकण टाकत नसल्याचे दिसते. त्याबरोबरच छोट्या ट्रकमध्ये तर लोखंडी गर्डर गाडीतून बाहेर लटकताना दिसतात. हे गर्डर अतिशय धोकादायक पध्दतीने बांधलेले असतात. ते जर सुटले तर त्यामागे जाणार्‍या वाहनचालकांना जिवाशी मुकावे लागेल. त्यामुळे अशा बेशिस्तांवर कडक कारवाई करावी.

रमेश खरात, दुचाकीस्वार

काही ट्रकवर आच्छादनेच नाहीत

मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकसारख्या वाहनांमधून बांधकाम साहित्यांची वाहतूक करताना ट्रकवर आच्छादन टाकणे आवश्यक आहे. त्यासोबतच प्रमाणापेक्षा अधिक साहित्य वाहनामध्ये भरू नये. तसेच कोणताही अपघात होऊ नये, यासाठी मालवाहतूक वाहनचालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा

Back to top button