फुले दाम्पत्य सन्मान महारॅली : ‘जय ज्योती..जय क्रांती’चा घुमला जयघोष | पुढारी

फुले दाम्पत्य सन्मान महारॅली : ‘जय ज्योती..जय क्रांती’चा घुमला जयघोष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जय ज्योती…जय क्रांतीच्या जयघोषाने दुमदुमलेला आसमंत…विविध फलकांमधून उलगडलेले फुले दाम्पत्याच्या कार्याचे महत्त्व अन् ढोल – ताशाच्या निनादात सोमवारी फुले दाम्पत्य सन्मान महारॅली काढण्यात आली. क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर महारॅलीत करण्यात आला. जागोजागी रांगोळ्याच्या पायघड्या, ढोल – ताशा पथकांचे वादन, लेझीम पथकाचे सादरीकरण आणि लोकांचा उत्स्फूर्त सहभाग हे या रॅलीचे वैशिष्ट्य ठरले.

महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली करून देण्याच्या या ऐतिहासिक घटनेला 176 वर्षे पूर्ण झाले. यानिमित्ताने सोमवारी फुले दाम्पत्याच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारकाचे निर्माण तसेच विकास करण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी माळी महासंघातर्फे महारॅलीचे आयोजन केले होते. बुधवार पेठेतील भिडेवाडा ते गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा अशी महारॅली काढण्यात आली.

आमदार रवींद्र धंगेकर, माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे, माजी आमदार कमल ढोले – पाटील, पुणे शहराध्यक्ष दीपक जगताप, माजी महापौर वैशाली बनकर, मनसे सरचिटणीस वसंत मोरे, माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते. सावित्रीबाईंनी जिथे स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्या भिडेवाडा येथून या रॅलीला सुरुवात झाली. महात्मा फुलेवाड्यात उपस्थितांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या रॅलीचा समारोप ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे झाला. या महारॅलीत नायगाव येथील महिलांचे ढोल पथक, गावकर्‍यांचे ढोल पथक, ठाणे आणि पवना येथील ढोल पथके सहभागी झाले होते.

हेही वाचा

 

Back to top button