जगातील सर्वात उंच लाकडी पवनचक्की! | पुढारी

जगातील सर्वात उंच लाकडी पवनचक्की!

लंडन : एखादी अतिशय उंच पवनचक्की आहे आणि ती चक्क लाकडापासून बनवली आहे म्हटल्यावर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटू शकेल; मात्र एका स्विडिश फॅक्टरीत अशी पवनचक्की तयार करण्यात आली. ही पवनचक्की तब्बल 150 मीटर म्हणजेच 492 फूट उंचीची आहे.

‘मोडवियन’ या स्विडिश स्टार्टअप कंपनीने ही जगातील सर्वात उंच लाकडी पवनचक्की निर्माण केली आहे. कंपनीचे सीईओ ओट्टो लुंडामन यांनी सांगितले की, या लाकडी पवनचक्कीचे अनेक फायदे आहेत. या पवनचक्कीची तिच्या सर्वात पात्यापर्यंतची उंची 492 फूट आहे. पवनचक्कीच्या टोकावर 2 मेगावॅट जनरेटर आहे. या पवनचक्कीने नुकताच स्विडिश ग्रीडला वीजपुरवठा सुरू केला आहे. या ग्रीडमधून 400 घरांना वीज मिळते. मोडवियन प्रकल्पाशेजारीच अन्यही अनेक पवनचक्क्या पाहायला मिळतात; मात्र त्यांच्यामध्ये लाकडाऐवजी स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

जगभरात बहुतांशी अशाच पवनचक्क्या असतात. स्टील हे मजबूत असते व दीर्घकाळ टिकते. त्यांच्या साहाय्याने जमिनीवर आणि समुद्रातही पवन ऊर्जा प्रकल्प तयार करता येतो; मात्र स्टीललाही त्याच्या काही मर्यादा आहेत. विशेषतः जमिनीवरील प्रकल्पामध्ये. इतक्या उंच टर्बाईनसाठी धातूचे मोठे तुकडे प्रकल्पापर्यंत नेणे हे एक जिकिरीचेच काम आहे. लाकडी आणि स्टील अशा दोन्ही टर्बाईनवर संरक्षणासाठी जाड पांढरा थर दिलेला असतो. तसेच दोन्हीकडे जनरेटरला जोडलेली पाती फायबर ग्लासपासून बनवलेली असतात. ही पाती फिरली की, वीज तयार होते; मात्र टॉवरच्या आत गेल्यावर फरक दिसतो. लाकडी पवनचक्कीच्या भिंतीमध्ये लाकूड वापरलेले असते.

Back to top button