‘मिशन ४५’ यशस्वी करण्यासाठी भाजपच्या हालचाली गतिमान | पुढारी

‘मिशन ४५’ यशस्वी करण्यासाठी भाजपच्या हालचाली गतिमान

शशिकांत सावंत

ठाणे ः लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजप ‘मिशन-45’ हे धोरण राबवित आहे. भाजपने विजयासाठी नवा प्लॅन तयार केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाच्या काही लोकांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी राजी केले जाईल. त्याचबरोबर काही खासदारांची तिकिटे कापून नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाईल, असेही सांगितले जात आहे.

भाजपच्या मिशन-45 मध्ये जे काही नवीन चेहरे येऊ घातले आहेत, त्यामध्ये चंद्रपूरचे आमदार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेला उभे राहू शकतात. हा मतदारसंघ पूर्वी भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र, काँग्रेसच्या सुरेश धानोरकर यांनी अनपेक्षितरीत्या तो जिंकला होता. दुसर्‍या बाजूला ठाण्यामध्ये ठाकरे गटाचे राजन विचारे खासदार आहेत. या जागेवर विजय मिळवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजप रिंगणात उतरवू शकते. भाजपने एका घरात एकच उमेदवार, असे जाहीर केल्याने सिंधुदुर्ग- रत्नागिरीमधून माजी खासदार नीलेश राणेंना उमेदवारी द्यायची की रवींद्र चव्हाण यांना या मतदारसंघात उतरवायचे याबाबतही भाजप विचार करत आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्रिपद हे रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. नारायण राणे यांचे एक पुत्र कणकवलीत आमदार आहेत. त्यामुळे लोकसभेला रवींद्र चव्हाण हे ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांच्या विरोधातही निवडणूक लढू शकतात. तसे झाल्यास स्वच्छ चेहरा म्हणून ज्यांची प्रतिमा आहे, असे संजय केळकर हे ठाणे लोकसभेतून रिंगणात उतरू शकतील. मराठा आंदोलनाची धग कमी करण्यासाठी मराठा विरुद्ध ओबीसी असे ध्रुवीकरण जे छगन भुजबळ यांनी सुरू केले, या मागेही जातीय मतांच्या ध्रुवीकरणाचा भाग असल्याची चर्चा आहे.

नवे चेहरे रिंगणात

काँग्रेसनेही तरुण चेहर्‍यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे, दक्षिण-मध्य मुंबई वर्षा गायकवाड, सांगलीतून विश्वजित कदम किंवा विशाल पाटील, के. सी. पाडवी असे नवे चेहरे काँग्रेस रिंगणात उतरवणार आहे. त्यामुळे भाजपनेही तरुणांना रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. तीन पक्षांची एकत्र आलेली ताकद आणि उमेदवारीसाठी अनेक उमेदवार असल्याने उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेमध्ये भाजपला मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.

बी टीम स्ट्रॅटेजी…

भाजप आपल्या विजयासाठी काही मतदारसंघ बी टीमही तयार करू शकते. मागच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ मतदारसंघांतील उमेदवार पडले होते. अशाच पद्धतीने अपक्षांना ताकद देऊन महाविकास आघाडीची व्होट बँक कमी करणे ही स्ट्रॅटेजी भाजप आखत आहे. मागच्यावेळी ‘वंचित’मुळे पडलेल्या जागांमध्ये हातकणंगले, सांगली, अमरावती, अकोला अशा प्रमुख मतदारसंघांचा समावेश होता. या मतदारसंघात ‘वंचित’ महाविकास आघाडीत राहिली, तर भाजपला वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत.

Back to top button