मंगळभूमीवर रोव्हर चालवणारी पहिली भारतीय व्यक्ती | पुढारी

मंगळभूमीवर रोव्हर चालवणारी पहिली भारतीय व्यक्ती

वॉशिंगटन : कल्पना चावला, सुनीता विल्यम्स या अंतराळवीरांगनांनंतर आता ‘नासा’च्या माध्यमातून एका भारतीय तरुणीने मोठी कामगिरी करून दाखवली आहे. या तरुणीचे नाव आहे डॉ. अक्षता कृष्णमूर्ती. अक्षता ही मंगळ ग्रहावर रोव्हर चालवणारी पहिली भारतीय व्यक्ती ठरली आहे. तिच्या या कामगिरीने अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास रचला गेला आहे. पृथ्वीवरून मंगळावरील हे रोव्हर नियंत्रित करण्याचे कौशल्य तिने दाखवले.

सोशल मीजियावर अक्षताने केलेली एक पोस्ट सर्वांना प्रेरणा देणारी आहे. 30 नोव्हेंबरदरम्यान तिने सोशल मीजियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये अक्षता सांगते की, ‘हे माझ्यासाठी शक्य नाही, म्हणून मी माझं क्षेत्र बदलावं, असे अनेकांना वाटत होते; पण मी जिद्द सोडली नाही. आपलं काम करत राहिले. पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर मला नासामध्ये नोकरी मिळाली. काम करायचं असेल तर वेडेपणा असावा लागतो.’ अक्षताने मॅसाच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पीएच.डी. केली आहे. अक्षता ही ’नासा’ मध्ये इन्वेस्टिगेटर आणि मिशन सायन्स फेज लीडस् या पदावर आहे. ती गेली 5 वर्षे ‘नासा’मध्ये काम करत आहे. अक्षता ‘नासा’च्या त्या मोहिमेमध्ये सहभागी होती, ज्यामध्ये अंतराळ संस्था मंगळ ग्रहावरील नमुने गोळा करत होती. या मोहिमेदरम्यान तिने मंगळ ग्रहावर रोव्हर चालवून एक मोठी कामगिरी पार पाडली होती.

13 वर्षांपूर्वी सुरू झाला होता प्रवास

‘नासा’पर्यंतचा अक्षताचा प्रवास हा 13 वर्षांपूर्वीच सुरू झाला होता. ‘नासा’मध्ये काम करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षताही अमेरिकेला पोहोचली होती. बाहेरील देशात जाऊन नोकरी करणं या प्रवासात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. अक्षता सांगते की, ‘मला अनेकांनी सांगितलं होतं हे काम तुझ्याकडून होणार नाही. तू तुझ्या स्वप्नांचा पुन्हा एकदा विचार कर’. यामध्ये अक्षताने कुणाचंही न ऐकता आपल्या ध्येयावर ठाम राहून आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत राहिली. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये अक्षताने सांगितलं आहे की, ‘एमआयटी’ मध्ये पीएच.डी. करण्यापासून ते नासामध्ये रुजू होण्यापर्यंतच्या प्रवासात 100 दारं ठोठवावी लागली होती. या प्रवासात कोणतीच गोष्ट सोपी नव्हती. कोणतंही स्वप्न अवघड नसतं. स्वत:वर विश्वास ठेवा आणि प्रचंड मेहनत करा, तुम्हाल तुमचे यश नक्की मिळेल.

Back to top button