पुरंदरमध्ये 32 हजारांहून अधिक बोगस मतदार : विजय शिवतारे यांची तक्रार | पुढारी

पुरंदरमध्ये 32 हजारांहून अधिक बोगस मतदार : विजय शिवतारे यांची तक्रार

पुणे : सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव मतदारसंघातील तब्बल 32 हजार 366 मतदारांची नावे पुरंदर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली आहेत. मतदार यादीतील ही बोगस नावे वगळून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय निवडणूक निर्वाचन अधिकारी यांच्याकडे केल्याची माहिती माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दिली. यासंदर्भात 175 पानांचा अहवाल ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवतारे म्हणाले की, 202 पुरंदर मतदारसंघातील बोगस मतदाराचे नाव कुठल्या केंद्रावर व किती नंबरला आहे. यासोबतच 285 पलूस कडेगाव मतदारसंघात तो कुठल्या केंद्रावर व किती क्रमांकाचा मतदार आहे. येथपर्यंत सखोल माहिती देण्यात आली आहे. पुरंदर तालुक्यातील आंबेगाव, येवलेवाडी, फुरसुंगी, निरा, सासवड आणि जेजुरी शहरातही हजारो नावे आढळून आली आहेत.

या प्रकरणात ही नावे लावणारे मतदार नोंदणी अधिकारी आणि दुबार मतदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही केल्याचे शिवतारे यांनी सांगितले. 2014 साली पुणे लोकसभा मतदारसंघात सव्वा लाख मतदारांची बोगस नावे लावल्याने तत्कालीन उमेदवार अनिल शिरोळे यांनी आंदोलन देखील केले होते. याकडेही शिवतारे यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा

Back to top button