Weather Update : पुणे 11.9 अंशावर, राज्यात नीचांकी | पुढारी

Weather Update : पुणे 11.9 अंशावर, राज्यात नीचांकी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहराचा पारा शनिवारी राज्यात सर्वांत नीचांकी ठरला. शहराचा पारा 11.9 अंशापर्यंत खाली आला होता. दरम्यान, हिंदी महासागरासह अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने नव्या वर्षात कोकण व मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम विषुववृत्तीय हिंदी महासागर आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने वार्‍याचा वेग वाढला असून, देशभरातील बहुतांश राज्यांत हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात 3 ते 5 जानेवारी या काळात कोकणात तर 5 जानेवारी रोजी मध्यमहाराष्ट्राला हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतात अजूनही पश्चिमी चक्रवात सक्रीय असून त्या भागात दाट धुके अन् कडाक्याची थंडी आहे. तसेच 1 ते 5 जानेवारी या कालावधीत या सर्व भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्यामुळे नव्या वर्षाची सुरुवात पावसाने होत आहे.

चक्रीवादळाची तयारी सुरु

आगामी 48 तासांत दक्षिण अरबी समुद्र आणि लगतच्या पश्चिम विषुववृत्तीय हिंदी महासागराचा काही भाग आणि ईशान्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळासारखी स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य भारतातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

शनिवारचे राज्याचे तापमान..

पुणे 11.9,नगर 12.5,कोल्हापूर 17, महाबळेश्वर 15, नाशिक 14.2, सांगली 15, सातारा 12.4, सोलापूर 16.7, छत्रपती संभाजीनगर 14.4, परभणी 15.4, नांदेड 15.2, अकोला 16.3, अमरावती 15, चंद्रपूर 14, गोंदिया 12.6, नागपूर 14.8, वर्धा 14.6

हेही वाचा

Back to top button