Pune : नांदेडला दारूच्या दुकानावर दरोडा | पुढारी

Pune : नांदेडला दारूच्या दुकानावर दरोडा

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथील देशी दारूच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकून रोख रक्कम, मोबाईल फोन आदी ऐवज लुटला. याप्रकरणी हवेली पोलिसांनी 36 तासांत चार सराईत गुन्हेगारांना गजाआड केले. मात्र, या टोळीतील अद्याप दोन दरोडेखोर फरार आहेत. बुधवारी (दि.27) रात्री दहाच्या सुमारास या टोळीने धारदार शस्त्रासह दरोडा टाकून दुकानदारांसह नागरिकांवर हल्ला केला. त्यात आठ जण जखमी झाले. त्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. अमोल पद्माकर सोळंके (वय 22, रा. गोकूळनगर, धायरी फाटा), मुक्तार जाहीद शेख (वय 19, रा. बेनकर वस्ती, धायरी), अमोल भगवान शिर्के (वय 27, रा. कोल्हेवाडी, ता. हवेली) व अभिषेक नागेश कांबळे (वय 22, रा. अंजलीनगर, कात्रज), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हातात धारदार शस्त्रे घेऊन दरोडेखोरांनी थैमान घातले. प्रथम पानटपरी चालकासह रस्त्यावरील नागरिकांवर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर देशी दारूच्या दुकानात शिरून शटर बंद केले. दुकानदार व मद्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांवर हल्ला करून रोख रक्कम, मोबाईल असा ऐवज लुटला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.ऐघटनेचे गांभीर्य पाहून जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल ,अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या देखरेखीखाली उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले-पाटील, वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने दरोडेखोरांचा तपास सुरू केला.

धायरी, सिंहगड, खेड-शिवापूर परिसरात शंभरहून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे व स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार, पोलिस हवालदार संतोष तोडकर, बी. ए. गायकवाड, राजेंद्र मुंढे, महेंद्र चौधरी, पी. एल. काळे आदींच्या पथकाने रात्रंदिवस तपास केला. आरोपी काही वेळातच वास्तव्याच्या जागा बदलत असल्याने कारवाईत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते. मात्र, खडतर शोध मोहीम राबवून अखेर शुक्रवारी चार आरोपींना पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले. या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. दोघे आरोपी अद्याप फरार आहेत. त्यात एक जण अल्पवयीन आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विकास अडागळे तपास करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button