पालिका शाळांत विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी कधी? | पुढारी

पालिका शाळांत विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी कधी?

पिंपरी : राज्यभरात डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन स्वरूपात नोंदविणे सुरू झाले आहे. शिक्षकांना यापुढे मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविणे अनिवार्य आहे; मात्र पिंपरी-चिंचवड पालिकेच्या शिक्षण विभागास यासंबंधात कोणताही आदेश मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील पालिकेच्या शाळांतील विद्यार्थी अजूनही ऑनलाईन हजेरीपासून दूरच असल्याचे दिसून येत आहे.

नवीन ऑनलाइन हजेरीसंदर्भात राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी आदेश दिले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आता एक डिसेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने नोंदवली जाणार आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदविण्यासाठी ’अटेंडन्स बॉट’ च्या वापराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्गशिक्षकांनी ’स्विफ्ट चॅट’ अ‍ॅप डाऊनलोड करून त्यामधील अटेंडन्स बॉटद्वारे ऑनलाइन नोंदविणे आवश्यक आहे. चॅटबॉटच्या वापरासंबंधी विभाग, तालुका व केंद्रस्तरापर्यंत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत पर्यवेक्षकीय यंत्रणा आढावा घेणार आहे.

प्रशिक्षणात दिलेल्या सूचनेनुसार चॅटबॉटद्वारे इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवायची आहे.
मात्र, अद्याप याबाबत काही आदेश आला नसल्यामुळे शिक्षकांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले नाही. शालेय पोषण आहारातून ऑनलाइन नोंदणी होत असते. त्यामुळे आणखी ऑनलाइन हजेरी कशासाठी? असा प्रश्न शिक्षकांनाही पडला आहे.

शासनाकडून आम्हांला ऑनलाईन हजेरीचा आदेश आलेला नाही. आदेश मिळेल तेव्हापासून विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी नोंदविण्याचे काम सुरू केले जाईल.

– विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त, पिं.चि. मनपा शिक्षण विभाग

हेही वाचा

Back to top button