Pimpri : सांगवी येथे रंगणाऱ्या पवनाथडी जत्रेची महापालिकेकडून तयारी सुरू | पुढारी

Pimpri : सांगवी येथे रंगणाऱ्या पवनाथडी जत्रेची महापालिकेकडून तयारी सुरू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जत्रा 11 ते 15 जानेवारी 2024 असे 5 दिवस असणार आहे. प्रशासकीय पातळीवर त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व साहित्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून महापालिकेच्या वतीने दरवर्षी पवनाथडी जत्रा भरवली जाते. त्याला संपूर्ण शहरातून उदंड प्रतिसाद मिळतो. तसेच, विक्रीही मोठ्या प्रमाणात होते. जत्रेत शहरातील महिला बचत गटांचे तब्बल 400 स्टॉल असणार आहेत. त्यात बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू, साहित्य, कपडे आदींसह खाद्यपदार्थाचे स्टॉल असणार आहेत.

स्टॉलसाठी बचत गटांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी 2 जानेवारी 2024 पर्यंत सायंकाळी 5.30 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. अर्ज पिंपरी येथील महापालिका भवनातील तळमजल्यावरील समाज विकास विभागात स्वीकारले जाणार आहेत. प्राप्त अर्जातून सोडत काढून स्टॉलचे वितरण केले जाणार आहे. हे स्टॉल विनामूल्य देण्यात येतात. त्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही.

जत्रेत बचत गटांच्या स्टॉलसह महापालिकेच्या समाज विकास विभाग, नवी दिशा, दिव्यांग कक्ष, स्मार्ट सिटी तसेच, विविध विभागांचे स्टॉल असणार आहेत. तसेच, पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. तसेच, विविध क्षेत्रातील मान्यवर व तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिरही असणार आहेत. तसेच, बालगोपाळांसाठी मनोरंजननगरी असणार आहे.

जत्रेसाठी 1 कोटी 30 लाखांचा खर्च

पवनाथडी जत्रेसाठी भव्य मंडप उभारला जातो. त्याचा खर्च 62 लाख इतका आहे. तर, वीजजोडणी व प्रकाशव्यवस्थेचा खर्च 45 लाख इतका आहे. तसेच, इतर खर्च आहे. असे एकूण 1 कोटी 30 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

निवड झालेल्या महिला बचत गटांना मोफत स्टॉल देणार

सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे पवनाथडी जत्रा आयोजित केली जाणार आहे. शहरातील एकूण 400 महिला बचत गटांना तेथे मोफत स्टॉल देण्यात येणार आहेत. यातून महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यासाठी 2 जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जात आहेत. सोडत काढून स्टॉलचे वितरण केले जाईल, असे महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button