पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राज्यभरात अंगणवाडीसेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून बेमुदत बंद पुकारला आहे. आज बंदला 25 दिवस उलटूनही मागण्यांबाबत शासन निर्णय घेत नाही. त्यामुळे अंगणवाडीसेविकांनीही या वेळी मागण्या मान्य होईपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे; मात्र शासन आणि अंगणवाडीसेविका यांच्यामध्ये अंगणवाडीत येणारे चिमुकले मात्र पोषण आहारापासून वंचित आहेत. बंदच्या कालावधीमध्ये या चिमुरड्यांची उपासमार होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहराच्या विविध भागात एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत शासनामार्फत 279 अंगणवाड्या चालविल्या जातात. अंगणवाडीमध्ये येणारी मुले ही आर्थिक दुर्बल घटकातील, बिगारी काम करणारे, हातावरचे पोट असणार्या कुटुंबांतील आहेत. शासनाकडून येणारा पोषण आहार मुलांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचतो का? यामध्ये अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची असते.
सध्या बंदमुळे मुलांचा पोषण आहार बंद झाला आहे. याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुलांचे आई-वडील अंगणवाडीच्या दारात मुलांना सोडून कामावर निघून जात आहेत आणि ही मुले येणार्या खाऊकडे डोळे लावून बसतात, अशी परिस्थिती आहे. शासन आणि अंगणवाडीसेविका यांच्यामध्ये चिमुकल्यांना नाहक त्रास होत आहे.
पंचवीस दिवस उलटूनही शासनाकडून निर्णय होत नाही. बंदमुळे मुलांची उपासमार होत आहे. काही ठिकाणी शासनाने पर्यायी व्यवस्था करून अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार पुरविण्याची सोय केली आहे; मात्र ती अल्प प्रमाणात आहेत; तसेच अंगणवाडीतील खर्या लाभार्थीपर्यंत हा पोषण आहार पोहोचतो का, याबाबतही शंका आहे. यासाठी शासनाने चर्चा करून सुवर्णमध्ये साधावा, अशी अपेक्षा अंगणवाडीसेविका करत आहेत.
कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यामध्ये अंगणवाडीसेविका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत; मात्र त्यांच्या मागण्या शासनाने अद्याप मान्य केल्या नाहीत. एकीकडे कुपोषण कमी करण्यासाठी पोषण आहाराची योजना राबविणे आणि दुसरीकडे सेविकांना त्यांचा हक्क न देणे यामध्ये शासनाची दुटप्पी भूमिका आहे. येत्या 4 जानेवारी रोजी अंगणवाडी सेविका पुन्हा मुंबई याठिकाणी आंदोलन करणार आहेत, असे अंगणवाडी सेविकांनी सांगितले
हेही वाचा