निधीवाटपात पुरंदर भाजपवर अजित पवारांकडून दुजाभाव | पुढारी

निधीवाटपात पुरंदर भाजपवर अजित पवारांकडून दुजाभाव

सासवड : पुढारी वृत्तसेवा :  पालकमंत्री अजित पवार हे पुरंदर तालुक्यात विकास निधीवाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप देत असून, भाजपशी दुजाभाव करत आहेत, असा आरोप जिल्हा नियोजन मंडळावरील भाजपचे सदस्य गिरीश जगताप यांनी केला आहे.
महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवार यांनी शिवसेनेच्या आमदारांना निधी वाटपात दुजाभाव केला असल्याच्या त्यावेळेस तक्रारी होत्या तीच परिस्थिती आजदेखील आहे. याबाबत तीन ही पक्षांच्या समन्वय समिती व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीवाटपाबाबतीतील होणार्‍या अन्यायाची तक्रार करणार असल्याचे गिरीश जगताप यांनी सांगितले.

काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी या महाविकास आघाडी सरकारने निधी वाटपाबाबत पुरंदरवर दुजाभाव केला होता, त्यानंतर राज्यात भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी लोकपयोगी कामांचा धडाका लावलेला आहे; परंतु पुरंदर विधानसभेसाठी डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्यामार्फत 25 कोटी रुपयांचा निधी विविध विकासकामासाठी जिल्हा नियोजनामधुन मंजूर करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. पुरंदर तालुक्याच्या विकासासाठी निधी मिळणे याचे आम्ही स्वागतच करतो, आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे.

परंतु महायुतीत भाजपा मोठा भाऊ असून, आमचे 106 आमदार आहेत. तर अजित पवार यांच्या पक्षाचे 40 आमदार आहेत. समन्वय समितीने ठरवून दिलेल्या ’फॉर्म्युल्या’नुसार निधीवाटप करणे आवश्यक आहे. परंतु पालकमंत्री अजित पवार यांनी यांनी जास्तीचा निधी राष्ट्रवादीला देऊन पुरंदरमध्ये भाजपावर अन्याय केला आहे असे दिसून येत असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंजूर केलेली कामेही पवार यांनी थांबवलेली आहेत, त्यांना जसा पुरंदरमध्ये राष्ट्रवादी पक्ष मजबूत करायचा आहे तसेच भाजपालाही पक्ष संघटना मजबूत करायची आहे. आमच्या माध्यमातून विकास करायचा आहे. पुरंदर उपसा योजना ही खरी पुरंदरसाठी मंजूर केली असून, त्याच्या आराखड्यात बारामतीचा उल्लेख ही नव्हता, तरीदेखील सध्या त्याचा विस्तार करून जास्तीत जास्त पाणी बारामती तालुक्याला जात आहे. पुरंदरमध्ये सध्या तीव— दुष्काळ आहे, तरीदेखील पुरंदर उपसाचे पाणी पुरंदरच्या जनतेला मिळत नाही, या विषयीही आमची तक्रार आहे, असे जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button