Pune News : बाल विज्ञान प्रदर्शन आजपासून; 447 स्टॉल्सची उभारणी | पुढारी

Pune News : बाल विज्ञान प्रदर्शन आजपासून; 447 स्टॉल्सची उभारणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे आजपासून (दि. 26 ते 31) राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत कोणत्याही एका राज्याच्या मदतीने चक्राकार पद्धतीने मुलांसाठी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते. 50 व्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनी 2023 चे यजमानपदाचा मान महाराष्ट्राला देण्यात आला आहे. शालेय वयातच विज्ञान विषयाची गोडी लागावी व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या हेतूने राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनीचे आयोजन केले जाते. 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना आपली सृजनशीलता दाखवण्यासाठी बाल वैज्ञानिक प्रदर्शनीच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.

या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीमध्ये राज्य शासन, केंद्रीय विद्यालय संघटन, नवोदय विद्यालय, अ‍ॅटोमिक एनर्जी केंद्रीय विद्यालय, तिबेटीयन विद्यालय, एन. सी.ई. आर. टी. सी संलग्न शाळा आदी विविध व्यवस्थापनाच्या शाळा सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीमध्ये अंदाजे 447 स्टॉल्सची उभारणी केली जाणार आहे. तसचे विविध शाळांमधील पाच हजारांहून अधिक विद्यार्थी प्रदर्शन पाहणार आहेत. बाल वैज्ञानिक प्रदर्शनीमध्ये राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनांमधून राष्ट्रीय स्तरावर पात्र झालेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

तसेच विज्ञानविषयक उत्कृष्ट कार्य करणार्‍या राज्यातील शासकीय व अशासकीय संस्थांचे स्टॉलही प्रदर्शनामध्ये मांडण्यात येणार आहेत. महाराष्ट्राची संस्कृती, पारंपरिक खेळणी आदी विषयांचे नाविन्यपूर्ण स्टॉल हे बाल वैज्ञानिक प्रदर्शनीचे वैशिष्ट्य राहणार आहे.राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीदरम्यान विविध सांस्कृतिक कलागुणही सादर करण्यात येणार आहे. विविध मार्गदर्शनपर व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून व तालुक्यातून शालेय विद्यार्थी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीला भेट देणार आहेत.

हेही वाचा

Back to top button