बृजभूषणना धोबीपछाड! | पुढारी

बृजभूषणना धोबीपछाड!

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची गेल्या गुरुवारी झालेली निवड रद्दबातल करत सरकारने माजी अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांना अखेर धोबीपछाड केले. गेल्या अनेक दिवसांपासून क्रीडा क्षेत्रात गाजणारा हा विषय आणखी चिघळण्याची वेळ आली होती. क्रीडा विकासाची धोरणे सातत्याने राबवणार्‍या आणि खेळाडूंकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरीची अपेक्षा करणार्‍या सरकारला त्यांनी कोंडीत पकडले तर होतेच; पण त्यामुळे थेट सरकारच्या प्रतिमेला धक्का लागण्याची वेळ आली होती.

आगामी निवडणुकांच्या तोंडावर त्यांना आणखी अभय देणे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला परवडणारे नव्हते. यामुळे वेळ येताच त्यांना त्यांच्याच मैदानात पद्धतशीरपणे चितपट केले गेले. कुस्ती महासंघाची निवडणूकही या महाशयांनी राजकीय डाव टाकत खिशात घातली होती. 15 पैकी 13 जागा जिंकून महासंघावर वर्चस्व कायम ठेवले होते. माजी कुस्तीगीर अनिता श्योरण यांचा 40 विरुद्ध 7 मतांनी पराभव झाला. त्यांच्याच गटाच्या संजय सिंह यांनी अध्यक्षपद मिळवले; तर दिल्लीचे जयप्रकाश, पश्चिम बंगालचे असितकुमार साहा, पंजाबचे कर्तारसिंग आणि मणिपूरचे एन. थोनी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.

मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यांना उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ पाच मते मिळाली. कार्यकारी समितीतील पाचही स्थानांवर बृजभूषण यांच्याच गटाचे. थोडक्यात, कुस्ती महासंघातील या निवडणूक दंगलीत बृजभूषण सिंह यांनीच बाजी मारली. पडद्याआड राहून कुस्तीची सूत्रे चालवण्याचे त्यांचे मनसुबे सरकारने अखेर उधळून लावले. गेल्या सात-आठ महिन्यांत विविध आव्हानांना सामोरे गेलेल्या कुस्तीगिरांचाच हा विजय. ऑलिम्पिक पदकविजेती कुस्तीगीर साक्षी मलिक हिने मात्र डोळ्यांतून अश्रू काढत निवृत्तीची घोषणा केली होती. विनेश फोगाट व बजरंग पुनिया या आघाडीच्या कुस्तीपटूंनी जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली होती. त्यांना काहीअंशी का असेना न्याय मिळाला.

आपल्या मागण्यांसाठी विशेषत: महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण, महासंघातील मनमानीबद्दल न्याय मागण्यासाठी देशभरातील अनेक नामवंत खेळाडू आणि कुस्तीपटू रस्त्यावर उतरले होते. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीसंदर्भात दिलेल्या आश्वासनांपैकी बृजभूषण यांचे कुटुंबीय किंवा त्यांच्या जवळील व्यक्तींना कुस्ती महासंघाची निवडणूक लढवण्यास परवानगी देणार नसल्याची खात्रीही दिली होती. त्यानंतरच कुस्तीगिरांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. परंतु, बृजभूषण यांचे जवळचे सहकारी संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने सरकारने आपला शब्द न पाळल्याची बजरंग पुनिया प्रभृती कुस्तीगिरांची भावना झाली. महिला कुस्तीगिरांना न्याय मिळण्याची आशा धूसर झाली असल्याची भावना व्यक्त करत, बजरंगने तर आपला ‘पद्मश्री’ पुरस्कार परत केला. मात्र, हा वणवा पेटण्याआधीच सरकार अ‍ॅक्शन मोडवर आले.

कुस्ती महासंघाची नवनिर्वाचित कार्यकारिणी निलंबित केली. ती करताना महासंघाच्या संविधानातील स्पर्धा आयोजनाच्या नियमांची पायमल्ली झाल्याचा ठपकाही ठेवला. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे नियंत्रण जुन्याच पदाधिकार्‍यांच्या हातात असल्याची टीकाही क्रीडा खात्याने केली. या सार्‍याच बाबी गंभीर तर होत्याच, क्रीडा संस्कृतीला खोडा घालणार्‍याही होत्या. महासंघाच्या निवडणुका ज्या पद्धतीने घेण्यात आल्या होत्या, त्याबद्दल अनेक क्रीडातज्ज्ञांनी आधीच आक्षेप घेतले होते. तसेच बृजभूषण यांच्या हातातच रिमोट कंट्रोल असल्याचेही त्यांनी म्हटले होते. साक्षी वा बजरंग यांची वेदनाही तीच होती. बृजभूषण यांचेच वर्चस्व राहिल्यास, महिला कुस्तीगिरांवरील अन्याय-अत्याचार होतच राहतील, अशी भीतीही व्यक्त झाली होती.

बृजभूषण बाजूला झाले, तरी त्यांच्याच हाती महासंघाची सूत्रे होती. या निवडणुकीवेळी त्यांच्या निवासस्थानी ‘दबाव तो रहेगा’ अशा घोषणा त्यांच्या समर्थकांनी दिल्या. त्यावरून या गटाची मानसिकता उघड झाली होती. आपल्याला कुस्तीचा आणि कुस्ती स्पर्धा आयोजनाचा अनुभव आहे, असा दावा करणारे संजय सिंह यांच्याकडे त्याची पुरेशी माहिती वा अनुभव नव्हता. त्यांच्या नव्या समितीने आपले कामकाज बृजभूषण यांच्या सरकारी बंगल्यातील जुन्या कार्यालयातून सुरू केले होते. अध्यक्षपदी निवडीनंतर काही वेळातच 15 आणि 20 वर्षांखालील गटासाठी संजय सिंह यांनी राष्ट्रीय स्पर्धेची घोषणा केली होती. तीही वादात अडकली आणि सरकारला कारवाईसाठी ठोस कारण मिळाले. स्पर्धा आयोजनासाठी आवश्यक प्रक्रिया न पाळल्याने आणि मल्लांना तयारीसाठी पुरेसा वेळ न दिल्याने, क्रीडा मंत्रालयाने महासंघाची कार्यकारिणीच बरखास्त करून टाकली. मात्र, बृजभूषण यांचे वादग्रस्त वर्तन व व्यवहार हेच या कारवाईमागील खरे कारण आहे. आपण आता कुस्तीतून निवृत्त होत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

कुस्तीत एखादा पैलवान चितपट झाल्यानंतर त्याने उठून आपला पराभव झाला असल्याचे जाहीर करण्यासारखेच हे आहे! खरे तर सरकारने बृजभूषण यांना उचलून आखाड्याबाहेर फेकून दिले आहे. मी बारा वर्षे कुस्तीची सेवा केली, असे सांगणारे बृजभूषण उत्तर प्रदेशातील एक दबंग नेते म्हणून प्रसिद्ध असून, कुस्तीगिरांची त्यांनी कोणत्या प्रकारची ‘सेवा’ केली, हे सर्वांना ठाऊक आहे. गेल्या काही वर्षांत महिला कुस्तीगीर मोठ्या प्रमाणात या क्षेत्राकडे वळू लागल्या होत्या. परंतु, बृजभूषणसारख्या संघटकांनी कुस्तीच्या क्षेत्राची माती केल्यामुळे कुस्ती क्षेत्रापासून मुली दूर जाण्याचा धोका निर्माण झाला होता. खेळाडूंपेक्षा संघटकाचेच महत्त्व जेथे वाढते, तेथे खेळाचा खेळखंडोबा होत असतो. तो थोडा उशिरा का असेना थांबवण्याचे स्वागतार्ह पाऊल क्रीडा मंत्रालयाने उचलले.

राजकारण, गटबाजीच्या तावडीतून कुस्तीसारखा खेळ, त्याचबरोबर भारतीय कुस्ती महासंघ वाचवण्याचे, त्याला नवी दिशा देण्याचे आणि कुस्तीगिरांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचे आव्हान तर राहीलच. ‘अपनी मट्टी की हमेशा इज्जत करना. क्यूंकि जितनी इज्जत तुम मट्टी की करोगी, उतनीही इज्जत मट्टी से तुम्हें मिलेगी,’ हा ‘दंगल’ सिनेमामधील संवाद केवळ कुस्तीच नव्हे, तर सर्व क्षेत्रातील क्रीडा व क्रीडापटू संघटकांनी लक्षात ठेवला पाहिजे!

Back to top button