पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार यांनी ३८ व्या वर्षी बंड केलं होतं. मी तर साठीच्या पलीकडे आहे, असे म्हणत शरद पवारांवर टीका करणाऱ्या अजित पवार यांना शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामती येथे शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्याविरोधात केलेल्या बंडाबद्दल सांगितली होती.
संबंधित बातम्या –
त्यावेळी अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी बंड केले तेव्हा ते फक्त ३८ वर्षांचे होते. माझे वय आता साठीच्या पलीकडे आहे. यावर शरद पवार यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले असून ते काय म्हणाले पाहा. बारामती येथे बोलत असताना शरद पवार म्हणाले, "माझे बंड नव्हतेच. आमच्या काळात आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण त्यावेळी महाराष्ट्राचे नेते होते. त्यांचा विचार घेऊनच आम्ही निर्णय घेतला. त्यासंबंधी आज तक्रार करण्याचे काहीच कारण नाही. यावर मला अधिक चर्चा करायची नाही."
इथून पुढे आता माझचं ऐका, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती. ते सरपंच आणि उपसरपंच यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. या मुद्द्यावर शरद पवारांना माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर शरद म्हणाले, 'ही गोष्ट खरी आहे. बारामतीमध्ये मागच्या दहा वर्षात माझे कोणत्याही कामात लक्ष नाहीये. स्थानिक निवडणुका असो, शैक्षणिक असो वा साखर कारखाने मी दहा वर्षात लक्ष दिले नाही. त्यामुळे या क्षेत्रात कुणी काम करावे, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. सर्वांना सोबत घेऊन या भागाचा विकास व्हावा, अशी माझी इच्छा आहे.'
अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ३८ व्या वर्षी जेव्हा पवार साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा भारतीय जनता पक्ष त्या सरकारमध्ये नव्हता. पण काँग्रेसमधील अनेक लोकं त्यांच्यासोबत होते. देशात लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाल मन मोकळं करण्याचा अधिकार आहे. पण कोण निवडून येणार ही जनता ठरवते.