मजूर, कामगारांचे मृत्यू कवडीमोल ? मृतांच्या वारसांना आर्थिक मदत नाहीच

मजूर, कामगारांचे मृत्यू कवडीमोल ? मृतांच्या वारसांना आर्थिक मदत नाहीच
Published on
Updated on
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सातत्याने अनेक अपघात, दुर्घटना व नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडतात. त्यात कामगार, मजूर तसेच, सर्वसामान्यांचा नाहक बळी जातो. त्यांच्या मृत्यूकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्यामुळे दुर्घटना महिन्याभरातच विस्मृतीत जातात. परिणामी, कामगार व मजूर, सर्वसामान्यांचे मृत्यू कवडीमोल ठरत असल्याचे 'श्रीमंत' अशा पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत स्पष्ट होत आहे. कोणतेही धोरण नसल्याने आर्थिक मदत देता येत नसल्याचे सांगत महापालिका प्रशासन हात झटकून मोकळे होत आहे.
लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे दुर्लक्ष 
तब्बल 181 किलोमीटर क्षेत्रफळात वसलेले पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे गेली आहे. शहरात पाच लाखांपेक्षा अधिक संख्येने कंत्राटी कामगार व कष्टकरी असल्याचा अंदाज आहे. शहरात दुर्घटना किंवा अपघात घडणे ही मोठी दुर्देवी बाब आहे. मात्र, त्या घटनेत कामगार, कष्टकरी, मजूर, सर्वसामान्य तसेच, गोरगरीबांचा बळी गेल्यास त्याला पाहिजे तितके महत्व दिले जात नाही. त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मृतांच्या नातेवाईकांना महापालिकेस आर्थिक सहायही मिळत नाही. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), पोलिस, कामगार उपायुक्त कार्यालय तसेच, इतर सरकारी यंत्रणा त्याकडे कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. अशा दुर्घटनेला शहरातील लोकप्रतिनिधी तसेच, सामाजिक व स्वयंसेवी संस्था आणि संघटनांही महत्व देत नसल्याचे मागील अनेक उदाहरणांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कष्टकरी संघटना, कामगार संघटना व युनियनकडून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासकीय राजवटीत महापौर वैद्यकीय सहाय्य निधी बंद 
महापालिकेत नगरसेवक असताना महापौर निधीतून विविध आजारासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येत होते. पिंपरी-चिंचवड सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महापौर आहेत. त्यांच्याकडून शहरातील रूग्णांना 5 हजार रूपयांची वैद्यकीय मदत दिली जाते. मात्र, महापालिका बरखास्त असल्याने गेल्या पावणेदोन वर्षांपासून या प्रकारची मदत देणे महापालिकेने बंद केले आहे.
मिळकतकर, पाणीपट्टी भरणार्‍यांचा विमा का नाही? 
महापालिकेचे मिळकतकर, पाणीपट्टी तसेच, विविध शुल्क भरणार्‍या शहरातील नागरिकांचा विमा काढणे महापालिकेचे एक कर्तव्य आहे. पुणे महापालिकेने निवासी मिळकतधारक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी 5 लाखांचा अपघाती विमा संरक्षण दिले आहे. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिका मिळकतधारक व त्यांच्या कुटुंबियांचा विमा का काढत नाही, असे प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना विमा पॉलिसी लागू करण्यात आली आहे. मग, शहरातील नागरिकांबाबत महापालिका प्रशासन उदासीन असल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
तळवडे, किवळे दुर्घटनेत  महापालिकेने हात झटकले 
तळवडे येथील विनापरवाना असलेल्या स्पार्कल फायर कॅण्डल बनविणार्‍या कारखान्यात स्फोट होऊन लागलेल्या आगीत 14 महिला कामगारांचा दुर्देवी बळी गेला आहे. कोणाची आई, कोणाची बहिण, कोणाची मुलगी त्यात कायमची हिरावली गेली आहे. तर, अशाच प्रकार किवळे येथे अवजड असे जाहिरत होर्डिंग पडून 5 मजुरांचा हकनाक बळी गेला. या दोन घटनांकडे गांभीर्‍याने पाहिले गेले नाही. त्यासंदर्भात आंदोलन, मोर्चे काढले गेले नाहीत. त्या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 3 लाखांची मदत मिळाली. तर, तळवडे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख मुख्यमंत्री सहायता निधीतून घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणात महापालिकेने कोणतेही आर्थिक मदत केली नाही. मदत देता येत नाही, असे सांगत हात झटकले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात दुर्घटना, अपघात किंवा नैसर्सिक आपत्तीमध्ये कोणाचा मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास महापालिकेकडून आर्थिक मदत करण्याची तरतूद नाही. तसे महापालिकेचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे आर्थिक मदत देता येत नाही. तळवडे व किवळे दुर्घटनेत वैद्यकीय उपचार व सेवा महापालिकेने पुरविले होते. 
                                                                 – प्रमोद जगताप, कामगार कल्याण विभागप्रमुख, महापालिका 
शहरातील प्रत्येक नागरिकांचे पालकत्व महापालिकेकडे असते. स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देणे अत्यंत गरजेचे आहे. घराचा कर्ता व्यक्तीच दुर्घटनेत मरण पावल्यास त्या कुटुंबाची मोठी वाताहत होते. त्या कुटुंबास आर्थिक आधार मिळावा म्हणून महापालिकेने अशा लोकांचे पालकत्व स्वीकारणे आवश्यक आहे. 
                                                                                           – मानव कांबळे, ज्येष्ठ कामगार नेते 
अशा आहेत शहरात घडलेल्या दुर्घटना 
  •  आगीत भाजणे
  • वाहनाची धडक होणे
  • विजेचा शॉक लागणे
  • उंच इमारतीवरून खाली पडणे
  • सीमा भिंत,
  • अवजड साहित्य व वस्तू अंगावर पडणे
  • खड्ड्यात गाडले जाणे
  • ड्रेनेज साफ करताना

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news