अकरा हजार चौरस फूट जागेत डाळींनी बनवले सीता-रामाचे चित्र | पुढारी

अकरा हजार चौरस फूट जागेत डाळींनी बनवले सीता-रामाचे चित्र

काठमांडू : नेपाळ आणि भारताच्या बिहार राज्याच्या दरम्यान प्राचीन काळातील मिथिला नगरी होती. तेथील राजांना निमी जनक राजाच्या काळापासूनच ‘जनक’ असे नाव पिढ्यान्पिढ्या दिले जात असे. त्यापैकी सिरध्वज जनक राजाची कन्या म्हणजे देवी सीता. अयोध्यानरेश दशरथाचा थोरला सुपुत्र भगवान श्रीरामाशी सीतेचा विवाह झाला. त्यामुळे नेपाळमधील लोक आजही श्रीरामाला आपला जावई मानतात. नेपाळमधील जनकपुर हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे. आता या जनकपूरमध्ये भगवान राम आणि माता सीता यांचे एक भव्य चित्र साकार करण्यात आले आहे.

हे चित्र तब्बल 11 हजार चौरस फुटांवर चित्र काढण्यात आले आहे. ते तयार करण्यासाठी तब्बल 101 क्विंटल डाळींचा वापर करण्यात आला. या डाळी एकाच प्रकारच्या नसून तब्बल 11 प्रकारच्या होत्या. माता सीता आणि भगवान राम यांचे हे जगातील सर्वात मोठे चित्र आहे, असा दावा करण्यात आला आहे. त्रेतायुगात झालेल्या भगवान श्रीराम व सीतादेवीच्या विवाहाचे हे चित्र आहे.

नेपाळमधील दोन आणि भारतातील आठ अशा एकूण दहा कलाकारांनी हे चित्र रंगभूमी मैदानात बनवले. या चित्राची लांबी 120 फूट असून रुंदी 91.5 फूट आहे. या चित्रात विश्वामित्र ऋषी आणि जनक राजाचाही समावेश आहे. विवाह पंचमीचे औचित्य साधून हे चित्र बनवण्यात आले होते. भारतातून आलेले प्रमुख कलाकार सतीश गुजर यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी गेल्या वर्षी अयोध्येतही अशाच प्रकारे डाळींच्या सहाय्याने सीतारामाचे भव्य चित्र बनवले होते. हे चित्र 10, 800 चौरस फूट जागेत बनवले होते.

Back to top button