पथ विक्रेत्यांकडे 54 कोटींची थकबाकी; रक्कम न भरल्यास होणार कारवाई | पुढारी

पथ विक्रेत्यांकडे 54 कोटींची थकबाकी; रक्कम न भरल्यास होणार कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळातील सतरा महिन्यांचे भाडे माफ करूनही शहरातील परवानाधारक पथारी, हातगाडी, लहान स्टॉलधारकांकडे महापालिकेची 54 कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका विशेष मोहीम हाती घेणार असून, नोटीस दिल्यानंतर वीस दिवसांत थकबाकी न भरल्यास स्टॉलजप्तीची कारवाई केली जाणार आहे. शहरातील पथारी, हातगाडी, लहान स्टॉलधारक आणि मोठ्या स्टॉलधारकांना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सशुल्क परवाना दिला जातो.

या व्यावसायिकांना परिसर आणि स्टॉलच्या आकारानुसार 50 ते 200 रुपयापर्यंत दैनंदिन भाडे आकारले जाते. तसेच शहरातील हजारो पथारी व खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या व्यावसायिकांचे झोन तयार करून त्यांचे त्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे.
परवानाधारक पथविक्रेत्यांनी महापालिकेकडून आकारले जाणारे शुल्क (भाडे) वेळच्या वेळी जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक व्यावसायिकांकडे 2017 पासून 54 कोटी रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान, पूर्वी भाडे किंवा थकबाकी भरण्यासाठी व्यावसायिकांना प्रशासनाकडून सदर रकमेचे चलन घेऊन मगच रक्कम भरावी लागत होती.

यासाठी व्यवसाय सोडून या कामासाठी वेळ देणे व्यावसायिकांना परवडत नाही. त्यामुळे अनेक व्यावसायिक भाडे किंवा थकबाकी भरण्यास चालढकल करतात. परिणामी, थकबाकीची रक्कम वाढत जाते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने भाडे किंवा थकबाकी भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडण्यात आले आहे. मात्र, तरीदेखील शहरातील परवानाधारक पथविक्रेते भाडे भरत नाहीत. त्यामुळे महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांना प्रथम नोटीस बजाविण्यात येणार आहे. नोटीस बजाविल्यानंतर वीस दिवसांत थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाणार आहे. मार्चपूर्वी ही थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button