Pimpri News : संथ सुरू असलेल्या प्रकल्पांना पुन्हा मुदत | पुढारी

Pimpri News : संथ सुरू असलेल्या प्रकल्पांना पुन्हा मुदत

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची विविधकामे सुरू आहेत. ती मुदतमध्ये पूर्ण न झाल्याने त्यांना सातत्याने मुदतवाढ देण्यात येत आहे. संचालक मंडळाच्या शुक्रवारी (दि. 22) झालेल्या बैठकीत अनेक प्रकल्पांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे झालेल्या बैठकीस विभागीय आयुक्त सौरव राव, महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, स्वतंत्र्य संचालक यशवंत भावे, प्रदीप भार्गव, पोलिस आयुक्त विनय चौबे, पीएमपीएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते, शहर अभियंता मकरंद निकम, सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, व्यवस्थापक मनोज सेठिया, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे आदी उपस्थित होते.

संचालन, व्यवसाय योजनेच्या मसुद्यास मंजुरी

पीएमपीएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते यांची नामनिर्देशित संचालक म्हणून निवड करण्यात आली. स्मार्ट सिटीतर्फे स्ट्रीटस अ‍ॅण्ड पब्लिक स्पेसेस राष्ट्रीय कार्यशाळा 12 व 13 जानेवारी 2024 ला आयोजित केले जाणार आहे. निगडी येथील कंमाड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरच्या संचालन व व्यवसाय योजनेच्या मसुद्यास मंजुरी देण्यात आली. कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार यांनी आभार मानले.

इन्क्युबेशन सेंटर ऑटो क्लस्टरकडे वर्ग

स्मार्ट सिटीचे इन्क्युबेशन सेंटर ऑटो क्लस्टरकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीआयएस सक्षम ईआरपी प्रकल्पांतर्गत विकसित होत असलेल्या आयटी सॉफ्टवेअरसह करार करून प्रकल्पाच्या धोरणात्मक निर्णयासाठी स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यांना अधिकारी प्रदान करण्यात आले आहेत.

हेही वाचा

Back to top button