पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशातील निवडणूक प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच जागरुक करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि भारत निवडणूक आयोग यांच्यात करार करण्यात आला असून, त्या अनुषंगाने उच्च शिक्षणातील विद्यापीठे, महाविद्यालय स्तरावर मतदार शिक्षण आणि निवडणूक साक्षरता याविषयी अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत.
यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांना लोकशाही, मतदान आदी प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी अभ्यासक्रमाची निर्मिती करणे, त्यासाठीचे श्रेयांक निश्चित करणे, वयाची 17 वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा मतदार नोंदणीसाठी संस्थास्तरावरील आराखडा तयार करून एआयएसएसई आणि यूडायस संकेतस्थळाला जोडणे, संबंधित विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करणे, अध्यापनासाठी शिक्षक-प्राध्यापकांना ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने प्रशिक्षित करणे, विद्यार्थ्यांमध्ये मतदान आणि त्याबाबतच्या प्रक्रियेबाबत जागरुक करण्यासाठी अभियान राबवण्यासंदर्भातील सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.
निवडणूक प्रक्रियेमध्ये, विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, भारतीय निवडणूक आयोगाचे मोबाइल उपयोजन, बॅलेट युनिट, मतदान विभाग, नियंत्रण विभाग, पीठासीन अधिकारी, दोन मतदान अधिकारी, पोलिंग एजंट, मतदान कप्पे आदींबाबतची माहिती दिली जाईल. निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देऊन जागरुक करण्याचा उद्देश आहे. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया समजावण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये अभिरूप निवडणूक (मॉक पोल) घेतली जाणार आहे. तसेच येत्या 25 जानेवारी रोजी शैक्षणिक संस्थांमध्ये 'राष्ट्रीय मतदार दिन' साजरा करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
सिस्टिमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टीसिपेशन (एसव्हीईईपी) ही यंत्रणा निवडणूक आयोगाने तयार केली आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजाविण्याचे कर्तव्य शालेय जीवनापासूनच शिकवले जाणार आहे.
हेही वाचा