रेल्वे डिझेल चोरीत चक्क ‘आरपीएफ’चेच कर्मचारी असल्याचा संशय | पुढारी

रेल्वे डिझेल चोरीत चक्क ‘आरपीएफ’चेच कर्मचारी असल्याचा संशय

दौंड : पुढारी वृत्तसेवा :  दौंड रेल्वे हद्दीतून मागील काही दिवसांपूर्वी डिझेलची मोठी चोरी झाली होती. ही चोरी होऊन जवळपास एक महिना झाला असून रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अधिकार्‍यांनी काही संशयितांना अटक केली. त्यातील काहीजण जामिनावर सुटले; परंतु आरपीएफच्या अधिकार्‍यांनी याबाबत माहिती देण्यास स्पष्टपणे नकार दिला. या प्रकरणात आरपीएफचे दोन कर्मचारी सहभागी असल्याची चर्चा आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दौंड रेल्वे हद्दीतून अनेक दिवसांपासून ही डिझेल चोरी होत होती. याची माहिती आरपीएफ व रेल्वे पोलिस यांना होती.

याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, आरपीएफमधील दोन कर्मचारी यामध्ये असल्यानेआरपीएफकडून पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती. पत्रकारांनी अनेकदा दौंडमधील आरपीएफच्या अधिका-यांच्याकडे जाऊन या प्रकरणाची माहिती मागितली. परंतु, त्यांनी स्पष्टपणे माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळेआरपीएफच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होत आहे. याबाबत दौंड शहरात उलटसुलट चर्चा आहे. वास्तविक पाहता, दौंड रेल्वे स्थानकावरदेखील हे आरपीएफ कर्मचारी प्रवाशांची तपासणीच्या नावाखाली लूटमार करतात, असेदेखील ऐकायला मिळते. मुजोर अधिकारी कोणालाही जुमानत नाहीत. दरम्यान या प्रकरणामध्ये आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

Back to top button